अक्कलकोटच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये समस्यांचा ढिगारा, तक्रार करूनही उपयोग होईना, नगरसेवकांची तक्रार
अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट शहरातील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ११ येथे सध्या समस्यांचा ढीग साचला आहे.याकडे आता लक्ष कोण देणार ? असा सवाल विचारला जात आहे.
रहिवाश्यांना वीज,पाणी,गटार,रस्ते अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरसेवक नगरपालिका कार्यालयात जाऊन रोज समस्यांचा पाढा वाचले तरी कोणीच दखल घेत नसल्याने वैतागले आहेत.त्यामुळे लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.शहरात एकूण ११ प्रभाग असून त्यापैकी सर्वात मोठा हा प्रभाग आहे. या भागात मागील काही दिवसांपासून विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. संस्थानकालीन थडगी मळा येथील विजेच्या खांबावर वेलीच्या झाडांनी सर्वत्र वेढा घातला आहे.यामुळे सतत अडचणी निर्माण होऊन वीज बंद होत असते. तसेच अनेक ठिकाणी केबल, दिवाबत्ती अशा प्रकारचे अडचणी संबधीत विभाग प्रमुख व ठेकेदार यांना सांगितले असता, कोणत्याही प्रकारचे साहित्य न.प कडे नसल्याचे सांगितले जाते. एल ई डी दिवाबत्ती मोठी खर्च करून काही ठिकाणी लावले असले तरी काही कारणाने बंद असून ते दुरुस्त केले जात नाही. यासंबधित कोणतेच विषय गांभीर्याने घेत नाहीत. यामुळे रात्रीच्यावेळी ग्रामीण रुग्णालय कामा संबधी येणाऱ्या रुग्णांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. तसेच म्हेत्रे नगर जवळील पाणी साठवण टाकीला क्षमतेपेक्षा अधिक कनेक्शन दिल्याने एकालाही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. काही कुटुंबाना कनेक्शन असून पाणी येत नाही. अनेकांना नवीन कनेक्शन हवे असून दिले जात नाही. यामुळे रोज पाणी चोरी होत आहे. या भागात सत्तर टक्के वस्तीत गटारी,अंतर्गत रस्ते नाहीत. यामुळे सर्वत्र गटारीचे दुर्गंधी व रस्ते चिखलाने माखून गेलेले आहेत. सार्वजनिक शौचालयाचे तर तीन तेरा वाजलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका
बसत आहे.
प्रभागात
फिरणे मुश्किल
रोज नगरपालिकेत जाऊन संबधित विभागाकडे पाठपुरावा करतो,परंतु कोणीच दखल घेत नाहीत.मागील वीस दिवसांपासून कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारी केवळ पाट्या टाकायचे कामे करीत आहेत. कर्मचारी वेळेवर कामे करत नसल्यामुळे आम्हाला प्रभागात फिरणे कठीण बनले आहे.
आलम कोरबू,
नगरसेवक