अक्कलकोट तालुक्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध; हंजगीत सर्वच उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने फेरनिवडणूक होणार
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र हे सोमवारी स्पष्ट झाले.या निवडणुकीत १ हजार ८२५ पैकी ६७३ जणांनी माघार घेतल्याने ६३४ जागांसाठी ९८० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.एकूण १७२ जागा ह्या बिनविरोध झाल्या आहेत तर ६ जागा ह्या रिक्त आहेत.या निवडणुकीत तालुक्यातील हंद्राळ, मातनहळळी,नागनहळळी,अंदेवाडी बुद्रुक, शिरशी, कुमठे, तोळणुर,उडगी, बणजगोळ या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर हंजगीमध्ये भरलेले १६ अर्ज माघार घेतल्याने पुन्हा या ठिकाणी फेरनिवडणूक होणार आहे.
उमेदवार माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच ७२ गावातील नेते मंडळी व त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी तहसीलच्या चोहोबाजूने झाली होती.अनेक प्रतिस्पर्धी उमेदवाराना माघार घेण्यासाठी विरोधी उमेदवार हे विनंती करत होते. दुपारी तीन पर्यंत हे चित्र पाहायला मिळाले.त्यानंतर वेळ संपल्यावर हळू हळू गर्दी ओसरत गेली. काही ठिकाणी चौरंगी, काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी अशा प्रकारच्या लढती या अनेक गावांमध्ये लागल्या आहेत. तालुक्यात सगळ्यात मोठा टप्पा म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जाते आणि या निवडणुकांच्या समीकरणावर पुढील स्थानिक स्वराज संस्थेच्या
निवडणुका अवलंबून असतात म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत आपल्याच गटाकडे राहण्यासाठी सर्वच नेतेमंडळींचे याकडे बारीक लक्ष आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार सांगवी बुद्रुकमध्ये १ जागा, डोंबरजवळगेमध्ये ३ जागा, मोट्याळ मध्ये १ जागा, चपळगावमध्ये ३ जागा, शेगावमध्ये ८ जागा, गुड्डेवाडीमध्ये ६ जागा, देवीकवठे मध्ये २ जागा, अंदेवाडी खुर्द मध्ये ५ जागा, बबलाद मध्ये २ जागा, गोगावमध्ये १ जागा, खैराटमध्ये १जागा, भुरीकवठेमध्ये १ जागा, संगोगी आ मध्ये १ जागा, तोरणी मध्ये ४ जागा, बागेहळळीमध्ये १ जागा,कर्जाळमध्ये २ ,बासलेगावमध्ये १ जागा, मराठवाडीमध्ये ३ जागा, बोरोटी खुर्द मध्ये ४ जागा, गळोरगीमध्ये १ जागा, सांगवी खुर्द मध्ये ६ जागा,दोड्याळमध्ये ७ जागा, कलहिप्परगेमध्ये १ जागा, किणीवाडी मध्ये १ जागा,चिंचोळी मैं मध्ये २ जागा, मुगळी मध्ये १ जागा, सिननुर मध्ये ७ जागा, चिक्केहळळीमध्ये २ जागा, वागदरीमध्ये १, गौडगाव खुर्द मध्ये ४, पितापूरमध्ये ६ जागा, हनूरमध्ये ४ जागा, मुंढेवाडीमध्ये २ जागा
तर तडवळमध्ये १ जागा बिनविरोध झालेल्या आहेत.शेगावमध्ये तब्बल ८
जागा बिनविरोध झाल्या होत्या पण
एका जागेसाठी त्या ठिकाणी निवडणूक
लागली आहे. काही गावात नुसती बिनविरोधची चर्चा होती पण त्या गावात पॅनल टू पॅनल निवडणुका लागल्याने अनेकांचे बिनविरोधचे स्वप्न भंगले आहे.
हन्नूर,शेगाव,दोड्याळ,
सांगवी खुर्द बिनविरोधपासून दूर
सगळ्यात पहिल्यांदा हंजगी गावात बिनविरोधची चर्चा होती.परंतु ऐन अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सर्वच्या सर्व सोळा उमेदवारांनी माघार घेतल्याने याठिकाणी नंतरच्या टप्प्यात फेरनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल हन्नूर,शेगाव,सिन्नर,दोड्याळ,सांगवी खुर्द, पितापुर, गुड्डेवाडी,अंदेवाडी खुर्द या गावात बिनविरोधची चर्चा होती पण या ठिकाणची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही या ठिकाणी काही जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत.