ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट : बोरी नदीचा पूर ओसरला; आता भीमा नदीकाठी पूरस्थिती,पुराचा ३३ गावाला फटका, ३५ जनावरे दगावली

 

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी सकाळी बोरी नदीला आलेला पूर ओसरल्याने मैंदर्गी,गाणगापूर दुधनी,अफजलपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे.प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

अक्कलकोट तालुक्यात एकूण तेहतीस गावांना या पुराचा फटका बसला आहे,असा अंदाज तहसील प्रशासनाने वर्तवला आहे.यामध्ये पस्तीस जनावरे दगावली असून दोनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपासून बोरी नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने बोरी नदीला आलेला पूर शुक्रवारी रात्रीपासून कमी होण्यास मदत झाली आहे.सकाळी आठ वाजता कुरनूर धरणाचे सहा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या धरणांमध्ये ऐंशी टक्के पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.१४ आणि १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या नुकसानीचा आढावा तहसील प्रशासनाने घेतला असून १ हजार २३४ कुटुंबाना या पुरामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे तर १ हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. ३२ ठिकाणी वाहतुकीच्या सुविधांवर परिणाम झाला आहे. ३२८ ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे तसेच ३५ जनावरे आणि दोनशे कोंबड्या दगावल्या आहेत,असे या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बोरी नदीचा पूर कमी झाल्यानंतर आता उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला असून आंदेवाडी कल्लकर्जाळ, शेगाव, आळगी, धारंसग,गुडडेवाडी, अंकलगे,हिळळी या सर्व गावात पाणी शिरले आहे.या भागातील शेती आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.या ठिकाणीही पिकांची प्रचंड हानी झाली आहे.आज दिवसभर भीमा नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळाली.या पार्श्वभूमीवर खानापूर,अंकलगे भागात आमदार सचिन कल्याणशेट्टी गटविकास अधिकारी महादेव कोळी यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.त्या ठिकाणची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत असून त्याबाबतचा अहवाल लवकरच तयार करण्यात येईल,अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.बोरी,हरणा
आणि भीमा या तिन्ही नद्याला यावर्षी पूर आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

– हजारो एकर
शेती पाण्याखाली

दोन दिवसात आलेल्या पुरामुळे तालुक्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.अनेक गावचा संपर्क तुटलेला आहे.बोरीचा पूर आता कमी होत असल्याने हळू हळू रस्ते खुले होत आहेत.यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!