मुंबई | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारतानं कांगारुचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर विजय मिळविला आहे. भारताच्या या विजयामुळे सर्वच स्तरातून भारतीय संघाचे आणि खास करून कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाच्या नेतृत्वाबाबात चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेला पसंती दिली आहे.
बिशन सिंग बेदी यांनी इंडियन एक्स्प्रेसला लिहिलेल्या आपल्या लेखात अजिंक्य रहाणे आणि संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आपल्या लेखात बेदी म्हणतात की, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेला जवळून पाहिलं आहे. कुशल कर्णधाराची सर्वात मोठी बाब म्हणजे, तो आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करतो हे होय. याबाबतीत मी रहाणेचा मोठा चाहता झालो आहे. या कसोटी मालिकेत त्यानं केलेल्या गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची केलेली योग्य प्लेसमेंट यावरुनच त्याचं कुशल नेतृत्व दिसून येतं.
ते पुढे म्हणाले, रहाणेचं नेतृत्व पाहून मज्जा आली. अशा परिस्थितीत भारतीय कसोटी संघाच्या नेतृतासाठी माझी पसंती अजिंक्य रहाणेलाचं असेल. पण भारतीय संघाचा कर्णधार कोण असावा हे मी ठरवू शकत नाही, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळनं निर्णय घ्या. विराट कोहलीला एक दिग्गज फलंदाज म्हणून खेळवणार? की साधारण कर्णधार म्हणून ? हा निर्णय क्रिकेट मंडळाचा आहे.