मुंबई – लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज कंपन्यांकडून वीज बिलं वाढवून देण्यात आली. वाढीव वीज बिलं माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरला होता. वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र आता राज्य सरकार वीज बिल सवलत देण्यावरून मागे हटले आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी वीज बिल माफीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
वीज बिलाच्या मुद्दावर मी राज्यपालांना भेटायला गेलो. राज्यपालांनी शरद पवार यांना बोलायला सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा. त्यात अदानी असतील, एमएसईबी असो वा टाटा, मी त्यांच्याशी बोलतो, असं पवार म्हणाले होते. मात्र पाच सहा दिवसांनी मला कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. या भेटीनंतर सरकारकडून सांगण्यात आलं की, वीज बिल माफ होणार नाही, असं सांगत राज ठाकरे यांनी पवार-अदानी बैठकीवर शंका उपस्थित केली.
दरम्यान वीज बिल माफ करणार नाही हा निर्णय कंपन्यांसोबत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेणदेणं झाल्याशिवाय हे झालं नसेल. सगळ्या कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम सरकार करत आहे,” असा आरोपही राज यांनी केला.
वीज बिलाच्या मुद्दावर मनसेच रस्त्यावर
वीज बिलाबद्दल सर्वात आधी मनसेने आंदोलन केले आहे. भाजप कुठेही नव्हते. पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, अस राज ठाकरे यांनी म्हटले. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर जमणार नाही. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, बिलात कपात करू आणि आता घुमजाव केलं असही राज ठाकरे यांनी म्हटले.