पुणे । कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी रोहित पवार यांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. पुण्यातील एका आगळ्यावेगळ्या प्रसंगामुळे त्यांचा एक ‘सेल्फी’ कौतुकाचा विषय ठरला आहे.
रोहित पवार पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये काम संपवून जेव्हा ते गाडीत बसले तेवढ्यात तेथे रुग्णालयात काम करणाऱ्या एका मावशींनी त्यांना आवाज दिला. कामाची धावपळ पाठीमागे असताना देखील त्यांनी त्या मावशींचा आवाज ऐकल्यावर आपली गाडी ताबडतोब थांबवली. त्यानंतर मावशी जवळ आल्यावर त्यांची व कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली. परंतु, हे सर्व झाल्यावर मावशींनी पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याबाबत त्यांना विचारणा केली. यावर पवार यांनी तात्काळ होकार दिला. पण खरी अडचण येथून पुढे निर्माण झाली.
कारण काही केल्या त्या मावशींनां सेल्फी काही घेता येईना. त्यामुळे त्यांना काही वेळ सुचेनाच काय करावे ते. तेवढ्यात रोहित पवार यांनी स्वतः त्यांचा मोबाईल सेल्फी फोटो काढला. त्यानंतर त्या मावशींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पवार यांना देखील सुखावणारा होता. राजकीय व्यक्ती म्हटलं की पाठीशी धावपळ ही ओघाने ठरलेलीच असते. त्याला रोहित पवार हे देखील अपवाद नाही. पण रुग्णालयातील भेटीनंतर एवढ्या गडबडीत सुद्धा त्यांनी त्या मावशींना वेळ देत सेल्फी घेतला. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अर्थात नेहमी आपल्या कामा दरम्यान येणारे छोटे-मोठे चांगले अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर पवार हे ठेवत असतात. उमेश मुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याविषयीची पोस्ट लिहिताना रोहित पवार यांच्या सोबतचे त्या मावशींचे फोटो देखील शेअर केले आहे. रोहित पवार यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचा हा क्षण त्या मावशींच्या जीवनात एक अविस्मरणीय आठवण देऊन गेला.