अक्कलकोट,दि.१५ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याचे जाहीर केले.या अनुषंगाने स्वामी भक्तांना स्वामी दर्शनाची लागलेली आस पुर्ण होत असल्याने दिवाळीची विशेष भेट भाविकांना शासनाच्यावतीने लाभली आहे. यामुळे आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांना वटवृक्ष स्वामी दर्शनाची वाट मोकळी झाली आहे,असे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प्रमुख महेश इंगळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना इंगळे म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील वटवृक्ष मंदीर समितीची व मंदीर कर्मचारी, सेवेकऱ्यांची तातडीची बैठक घेतली आहे. या बैठकीत स्थानिक जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने वटवृक्ष मंदीर उघडण्यासंदर्भात लेखी आदेश आल्यानंतर मंदीराचे मुख्य व गाभारा मंडपाचे द्वार उघडून भाविकांना दर्शनास सोडण्याचे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. प्रारंभी वटवृक्ष मंदीरातील गणेश मंदीर, शेजघर, ज्योतीबा मंडप बंदच ठेवून एका तासात सरासरी १०० भाविक गाभाऱ्यासमोर उभे राहून स्वामींचे मुख दर्शन घेवून सुखरूप बाहेर निघतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनाचे संकट आद्यापही टळले नसल्याने आपले जीवन आपली जबाबदारी याची जाण ठेवून भाविकांनी मंदीरात आपले वर्तन ठेवावे. भाविकांच्या सोईकरीता मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे. भाविकांनी मंदीरात प्रवेश करत असताना आपापल्या मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा. मंदीरात प्रवेश केल्यानंतर भाविकांनी मंदीर समितीचे कर्मचारी, सेवेकऱ्यांशी हुज्जत न घालता त्यांच्या सुचनांचे पालन करावे. स्वामींचे दर्शन घेत असताना भाविकांनी एकमेकाचे संपर्क शक्यतो टाळावे. सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे या करीता एका तासात अंदाजे शंभर भाविक दर्शन घेतील याचा उल्लेख केला. सर्व भाविकांनी कोरोना संदर्भातील शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास जगभरासह भारतातूनही या कोरोना नामक विषाणूचा नक्कीच विनाश होईल. पुढील आठवडाभर मंदीरातील परिस्थिती पाहून आठवड्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतील असेही स्पष्ट केले. मंदीर उघडल्यानंतर भाविकांनी लगेचच मोठया प्रमाणात गर्दी न करता मंदीरातील परिस्थितीचा आढावा अथवा अंदाज घेवून भाविकांनी दर्शनास येण्याचे नियोजन करावे,असे आवाहनही वटवृक्ष मंदीर समितीच्यावतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.