नवी दिल्ली – टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन असलेल्या महेंद्रसिंह धोनीने काही महिन्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली. धोनीच्या मैदानावरील आठवणींची अजूनही क्रिकेट विश्वात चर्चा होत असतानाच भारताचा विकेट किपर बॅट्समन पार्थिव पटेल याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून रिटायरमेंट जाहीर केली आहे
35 वर्षीय पार्थिव पटेलने 18 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 25 कसोटी सामने, 38 एकदिवसीय सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून 194 क्रिकेट सामने खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे.
पार्थिव पटेलने 2000 साली भारतीय क्रिकेट संघात आगमन केले होते. भारतासाठी कसोटी सामने खेळणारा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद झाली आहे. त्यावेळी, पार्थिवचे वय 17 वर्षे 153 दिवस होते. पार्थिवचे करिअर सुरू असतानाच भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीचे आगमन झाले. त्यानंतर पार्थिवला भारतीय संघात संधी मिळाली नाही. भारतीय संघात पहिला सामना खेळल्यानंतर दोन वर्षे 2 महिन्यांनी 2004 साली पार्थिवने गुजरातच्या संघासाठी रणजी सामना खेळला होता.