मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. शेलार अचानक पवारांच्या भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आशिष शेलार हे शरद पवार या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, शेलार यांनी नेमकी कशासाठी पवारांची भेट घ्यायला आले आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पवार मुंबई-पुण्यात सतत असतात असं असताना त्यांची मुंबई किंवा पुण्यात भेट घेण्यासाठी शेलारांना दिल्ली का गाठावी लागली? असा सवाल केला जात आहे. शेलार-पवारांच्या अचानक होत असलेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
शेलार हे एकटेच पवारांना भेटल्याचं सांगण्यात येतं. पवार-शेलारांची ही भेट राजकीय असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या आधी शेलार आणि पवार एका पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने एकत्रित आले होते. त्यावेळी शेलार यांनी मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. शेलार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शेलार यांच्यावर सारवासारव करण्याची वेळ ओढवली होती.