सोलापूर, दि.२९ : सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर व कंसाइज इंजिनिरिंग सोल्युशन प्रा. लि. पिंपरी -चिंचवड तर्फे जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन फिटनेस राईडचे आयोजन १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते.
सदर संकल्पनेमध्ये दिलेल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर पण कमी वेळेत सायकलिंग करणाऱ्या महिला श्रेणीत, पुरुष श्रेणीत व अभियंता श्रेणीत पहिल्या तीन सायकलपटूना बक्षीस म्हणून ट्रॉफी देण्यात आल्या.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नागरिक जवळपास तीन महिने लाॅकडाऊनमुळे घरी अडकून होते. अन् लॉकडाऊन काळात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर तर्फे सदर ऑनलाइन सायकलिंग राईड चे चॅलेंज देण्यात आले होती.
या उपक्रमात जवळपास १०० सायकलपटू यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. सदर उपक्रमास सोलापूर आणि इतर शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या राईड मध्ये १०० सायकलपटू तर्फे वैयक्तिक सायकलिंग केलेल्या राईडचा एकूण प्रवास हा सुमारे २०४२ किलोमीटर व १०० तासांचा एवढा होता.२८ सप्टेंबर रोजी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कंपनीचे व्यवस्थापक मनोजकुमार गायकवाड हे ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला. यावेळी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, डॉ. शंकर नवले, प्रा. नरेंद्र काटिकर, विश्वनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सोलापूर मध्ये सायकलिंगची मोठी चळवळ उभी राहण्यासाठी सायकलिस्ट फाऊंडेशनचे प्रयत्न हे अतिशय उत्तम आहेत आणि सायकलिंगमुळे होणारे फायदे ऑनलाईन सहभागी झालेल्या लोकांना आवर्जून सांगितले.
यासाठी सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष प्रा.सारंग तारे ,भाऊराव भोसले, शितल कोठारी, रजनीकांत जाधव, चेतन लिगाडे, अभिषेक दुलंगे यांचे सहकार्य लाभले.