ध्यास विश्वसार्ह बातमीचा

औरंगजेब काही स्वाभिमानाचे प्रतीक नाही, भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये’

औरंगाबाद : औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून पुन्हा एकदा रणकंदन माजले आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून सुरु असलेल्या वादावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील. औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, पाकिस्तानात हिंदू मंदिरांची  तोडफोड सुरु आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राईकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेने भूमिका बदललेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको.

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.

काँग्रेसने औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तशी जाहीर भूमिका काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली आहे. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही जुनाच आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत काही  बिघाडी होईल असे कोणाला वाटत असेल, तर ते ठार वेडे आहेत, असेही सामनामध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!