काँग्रेसचा आधारवड हरपला,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून म्हेत्रे कुटुंबियांचे सांत्वन
अक्कलकोट, दि.९ : काँग्रेसचे जेष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची दुधनी येथे भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
शिंदे यांनी सहपरिवार शुक्रवारी सकाळी ११ वाजता म्हेत्रे यांच्या फार्महाऊसवर स्व. सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या समाधीस्थळी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रणितीताई शिंदे, उज्वलाताई शिंदे, शंकर म्हेत्रे, चेतन नरोटे, सातलींग शटगार उपस्थित होते.
स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे ज्या दिवशी निधन झाले त्यादिवशी आपण परगावी होतो. त्यामुळे अंत्यसंस्काराला येऊ शकलो नाही,असे शिंदे यांनी सांगितले. सातलींगप्पा म्हेत्रे म्हणजे सर्व काँग्रेसी जणांचे आधार होते. सातलींगप्पा म्हेत्रे म्हणजे आमचे श्रद्धास्थान, काँग्रेसचा एका आधार, मार्गदर्शक निघून गेले. याचे आम्हाला खूप वाईट वाटले असे शिंदे म्हणाले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, सुरेश हसापुरे, संत दामाजी साखर कारखान्याचे समाधान आवताडे, अक्कलकोट तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मंगल पाटील आदी उपस्थित होते.