काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन,उद्या शनिवारी दुपारी 2 वाजता दुधनीत अंत्यसंस्कार
अक्कलकोट, दि.२ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे यांचे शुक्रवारी, अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.उद्या (शनिवारी ) दुपारी २ वाजता दुधनी (ता अक्कलकोट ) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे ते वडील होते.
अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीचे त्यांनी दोन वेळा चेअरमनपद भूषविले होते.दुधनी नगरपरिषदेवर सर्वाधिक काळ ते नगराध्यक्ष राहिले होते.२१ नोव्हेंबर १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला.अक्कलकोट तालुक्यासह अफजलपुर, आळंद, गुलबर्गा या तीन तालुक्यांमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता.या परिसरातील न्यायनिवाडे ते चांगल्या पद्धतीने करत असत. सामाजिक, कौटुंबिक, शेती विषयक तंटे त्यांच्याकडून सोडवले जात असत.अगदी सुप्रीम कोर्टात गेलेले प्रकरण सुद्धा दुधनीच्या जनता दरबारात ते निकाली काढत असत.तालुक्यात त्यांना भीष्मपितांमह म्हणून ओळखले जायचे.
सर्वप्रथम ते १९५९ ते १९६५ मध्ये ५ वर्ष, १९६७ ते १९८० असे १३ वर्ष, १९८६ ते १९९५ असे ९ वर्ष,१९९६ ते १९९७ मध्ये १ वर्ष, २००९ ते २०११ असे ३ वर्ष अशा पद्धतीने त्यांनी दुधनी नगरपरिषदेचा सर्वाधिक एक हाती कारभार सांभाळला.अनेक वर्षे ते बिनविरोध दुधनीचे नगराध्यक्ष होते.त्यांचा शब्द तालुक्यात प्रमाण असायचा.सध्या ते दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन देखील होते.१९७४ ते ८२ या काळामध्ये ते अक्कलकोट बाजार समितीचे चेअरमन होते.अक्कलकोट शहर आणि तालुक्यात काँग्रेस वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.त्यांच्या निधनाने तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
काँग्रेस पक्षाचा
निष्ठावंत नेता हरपला
जेष्ठ नेते कै.सातलिंगप्पा म्हेत्रे आणि माझी मैत्री १९७४ पासून होती.कै.नामदेवराव जगताप,कै.भाई छन्नूसिंग चंदेले यांच्याशी दृढ मैत्री होती. १९७४ पासून अक्कलकोट काँग्रेसची भिंत अभेद्य राखली.ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहिले.त्यांच्या जाण्याने म्हेत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ईश्वर त्यांना दुःख सहन करण्याची ताकद देवो.
सुशीलकुमार शिंदे,माजी केंद्रीय गृहमंत्री
दुधनी गावावर
शोककळा
दुधनी नगरपरिषदेत सर्वाधिक काळ त्यांनी नगराध्यक्षपद भूषविल्यामुळे त्यांचा प्रत्येकाशी जवळचा संबंध होता.गावात त्यांचे मोठे राजकीय वर्चस्व होते.त्यांच्या निधनाने दुधनी गावावर शोककळा पसरली आहे.