मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आले आहेत. आता कोर्टाच्या या निर्णयाबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांच्या राजकारणात कोर्टाने पडू नये, असा सल्ला राऊत यांनी न्यायालयांना दिला आहे. तसेच यंत्रणांना हाताशी धरून विकासकामांना खिळ घालण्याचे आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असाही सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. ‘कांजूरच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायानं देशाच्या विकासाचा विषय आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे.
याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरीबांसाठी घरं बांधणार होतं. मग आता ही जमिन सरकारची नाही का? अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. पंजाबमध्ये एका शिख संतांनी आत्महत्या केली आहे. पण महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.