ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर, जेऊर, गोगाव,हिळळी, किणीवाडीत पुन्हा सत्ताधाऱ्यांचेच राज्य,चुंगी,नागणसूर ,काझीकणबस, चपळगाववाडीत मात्र परिवर्तनाची लाट

 

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यात सोमवारी झालेल्या ६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला असून तालुक्यात चुंगी, बोरोटी बुद्रुक,चप्‍पळगाववाडी, काझीकणबस,नागणसूर याठिकाणी मात्र सत्ताधाऱ्यांना जोरदार हादरा बसला आहे. बोरोटी खुर्द,
गोगाव,बऱ्हाणपुर,कुरनूर,मोट्याळ,जेऊर,सिंदखेड,बासलेगाव,हिळळी, बबलाद, मराठवाडी, सांगवी बुद्रुक, किणीवाडी,भुरीकवठे या चौदा गावात मात्र जनतेने
पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे.

सोमवारी,सकाळी साडेआठ वाजता नवीन तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला.सकाळपासूनच निवडणूक लागलेल्या गावातील कार्यकर्त्यांचा लोंढा तहसील कार्यालयाकडे येत होता. तहसील कार्यालयाच्या चारी बाजूने कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.प्रत्येक जण निकालाच्या प्रतीक्षेत होता. मतमोजणीचे एकूण सहा टप्पे होते. टप्प्याटप्प्याने आतमध्ये उमेदवार प्रतिनिधी आणि उमेदवारांना सोडले जात होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट करण्यात आली होती. बोरोटी खुर्दमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने नऊपैकी सात जागा जिंकून पुन्हा वर्चस्व मिळवले. विरोधी दत्ता मोरे गटाला दोन जागा मिळाल्या. सिंदखेड येथे भालचंद्र मोरे गटाला तीन तर विरोधी दीपक पवार व नेताजी मोरे गटाला चार जागा मिळाल्या. याठिकाणी पवार आणि मोरे गटाने विजय मिळवला.गोगावमध्ये यावेळी मोठी चुरस निर्माण झाली होती. उद्योगपती मधुकर सुरवसे आणि अशोक मुलगे यांच्या पॅनेलने सात पैकी सात जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले.विरोधी महादेव होळे,बसप्पा आलुरे आणि पंडीत मूळजे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. बऱ्हाणपुरमध्ये सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिसला.भाजपचे पंचायत समिती सदस्य कयूम पिरजादे यांच्या गटाला चार तर सत्ताधारी इमामुद्दिन पिरजादे गटाला पाच जागा मिळाल्या.मोट्याळमध्ये माजी सरपंच कार्तिक पाटील यांच्या गटाने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवत चार जागा जिंकून विरोधकांना धूळ चारली.याठिकाणी काँग्रेसने बाजी मारली.विरोधी राजू इनामदार व अनिल इनामदार यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या. कार्तिक पाटील हे सलग चौथ्यांदा ग्रामपंचायतीवर निवडून गेले आहेत. डोंबरजवळगे ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागेसाठी निवडणूक लागली होती.अंबणा दुलंगे गटाविरुद्ध रामलिंग माळगे गट अशी लढत झाली.माळगे गटाला सात तर दुलंगे गटाला केवळ दोन जागा मिळाल्या.माळगे गटाने याठिकाणी पुन्हा सत्ता मिळवली.

गळोरगी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ प्रचंडे यांच्या गटाला पाच तर विरोधी बिराजदार – पाटील – आजूरे
गटाला चार जागा मिळाल्या.याठिकाणी सत्तापरिवर्तन झाले आहे.कर्जाळमध्ये चंद्रकांत इंगळे यांना जोरदार धक्का बसला.त्यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या तर विरोधी मल्लिनाथ ढब्बे गटाला सहा जागा मिळाल्या.बासलेगावमध्ये लालसिंग राठोड यांच्या पॅनेलचा पराभव झाला. जगदीश बिराजदार यांच्या पॅनेलने वर्चस्व मिळवले. उत्तर भागात चुरशीच्या ठरलेल्या चुंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजू चव्हाण आणि महादेव माने यांच्या पॅनेलला नऊ पैकी नऊ जागा मिळवल्या.विरोधी माजी सरपंच इरसंगप्‍पा गड्डे यांच्या पॅनेलला त्याठिकाणी जोरदार धक्का बसला.गड्डे यांच्या वर्चस्वाला यावेळी सुरुंग लागला गेला. चपळगाव ग्रामपंचायतीची निवडणुक अतिशय चुरशीची होती.यामध्ये उद्योगपती उमेश पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव,आप्पासाहेब पाटील आणि रियाज पटेल यांच्या पॅनेलला एकूण बारा जागा मिळाल्या तर विरोधी संजय बाणेगाव, महादेव वाले शाकीर पटेल यांच्या गटाला फक्त एक जागा मिळाली. विरोधी पॅनलचा त्याठिकाणी अक्षरशः धुव्वा उडाला.
भुरीकवठे ग्रामपंचायतीमध्ये श्रीमंत कुंटोजी यांच्या गटाची सत्ता होती त्या ठिकाणी
पुन्हा एकदा त्यांना जनतेने कौल दिला आहे.कुंटोजी यांच्या पॅनेलला चार तर विरोधी सिद्धाराम खुने यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या.दोन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. बोरोटी बुद्रुकमध्ये अशोक ढंगापूरे पॅनल विरुद्ध बसवंत कलशेट्टी यांच्या पॅनल उभे होते.त्या ठिकाणी कलशेट्टी यांची सत्ता होती. मात्र जनतेने त्या ठिकाणी परिवर्तन केले आहे.ढंगापुरे यांच्या पॅनेलला पाच तर कलशेट्टी यांच्या पॅनेलला चार जागा मिळाल्या.हालहळळीमध्ये राहुल रसनभैरे व हनुमंत बिराजदार यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या यात अनिल स्वामी आणि लक्ष्मण राजमाने यांच्या गटाचा दारुण पराभव झाला.हिळळी ग्रामपंचायतीमध्ये आप्पाशा शटगार व अशपाक मुजावर यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या.याठिकाणी त्यांचीच सत्ता होती. परमेश्वर यादवाड आणि
ओमप्रकाश बाके यांच्या गटाला मात्र त्याठिकाणी तीन जागा मिळाल्या.
पुन्हा या ठिकाणी शटगार गटाची सत्ता आली आहे.बबलाद ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये रमेश रोडगे व राजू लकाबशेट्टी यांच्या पॅनलने सहा जागा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले तर विरोधी बंदगी कोरवार यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या. चपळगाववाडी ग्रामपंचायतीमध्ये सिद्धाराम अंकलगे यांच्या पॅनेलला सात जागा मिळाल्या तर विरोधी भाजपच्या विश्वनाथ दोड्याळे गटाला एकही जागा जिंकता आली नाही.या ठिकाणी जनतेने मोठे परिवर्तन घडवले.किणीवाडीत सात जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये शिवयोगी तांबोळी गटाला पाच जागा तर विरोधी हरिबा जाधव गटाला एकच जागा मिळाली.यापूर्वी एक जागा बिनविरोध झाली आहे.याठिकाणी तांबोळी गटाची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. मराठवाडीमध्ये सात जागांसाठी निवडणूक झाली.यात विठ्ठल बेळे यांच्या गटाला दोन तर विरोधी दशरथ गायकवाड यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या या ठिकाणी गायकवाड गटाची सत्ता आली. यापूर्वी गायकवाड गटाचीच सत्ता होती.काझीकणबसमध्ये मात्र सत्ताधार्‍यांना जोरदार हादरा बसला असून अगसापुरे यांच्या पॅनेलला तीन तर दत्तात्रय मुनाळे व प्रभाकर मजगे यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या.याठिकाणी परिवर्तन झाले आहे.किरनळळीमध्ये शंकर उणदे गटाला एक तर सतिष कणमुसे गटाला सहा जागा मिळाल्या.कलहिप्परगेमध्ये ७ जागा
होत्या.यामध्ये महादेव बुक्कानुरे व आनंद बुक्कानूरे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले.
शिवपुत्र बुक्कानूरे गटाला धक्का बसला.चिक्केहळळी ग्रामपंचायतीमध्ये राजशेखर म्हेत्रे गटाला आठ जागा तर राहुल साळुंखे गटाला फक्त एक जागा मिळाली. याठिकाणी म्हेत्रे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले.सांगवी बुद्रुक मध्ये संजय भोसले, विष्णु भोसले आणि इरफान शेख यांच्या गटाने बाजी मारली.याआधीही त्यांचीच सत्ता होती. त्यांचे सर्व उमेदवार निवडून आले. विरोधी राजु रेड्डी गटाला एकही जागा मिळू शकली नाही.किणीमध्ये जेष्ठांविरुद्ध युवक अशी लढत होती.याठिकाणी अमोल हिप्परगे यांच्या पॅनेलला नऊ जागा मिळाल्या.
तर विरोधी स्वामीनाथ जाधव,अणप्पा अळळीमोरे, अशोक पाटील यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या.वागदरीतही जोरदार लढत पहायला मिळाली.विजयकुमार ढोपरे, रवी वरनाळे, सुधीर सोनकवडे,शिवराज पोमाजी यांच्या गटाविरुद्ध श्रीशैल ठोंबरे, लक्ष्मण मंगाणे, संतोष सोमाजी या गटात लढत झाली.या ठिकाणी ढोपरे- वरनाळे- सोनकवडे – पोमाजी गटाला नऊ तर ठोंबरे गटाला पाच जागा मिळाल्या.हैद्रा ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी दहा जागांवर बसवराज बिराजदार गटाचे वर्चस्व राहिले. तर प्रकाश मंगळवेढे यांना फक्त एक जागा मिळाली. दक्षिण भागांमध्ये नागणसूर ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष होते. त्या ठिकाणी विजयकुमार प्रचंडे,सतीश प्रचंडे यांच्या नंदीबसवेश्वर पॅनलला पाच जागा मिळाल्या तर बसव लिंगेश्वर चालक-मालक पॅनल बारा जागा मिळाल्या.गिरमला डोंगरीतोट, मल्लिनाथ कल्याण, बसलिंगप्पा थंब यांच्या गटाने याठिकाणी परिवर्तन घडविले.जेऊरमध्ये काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन पाटील यांच्या जेऊर ग्रामपंचायतीमध्ये सतरा पैकी सोळा जागांवर पाटील गटाने वर्चस्व मिळवून गावावरील वर्चस्व अबाधित ठेवले. विरोधी बंदेनवाज कोरबू गटाला एकही जागा मिळाली नाही. उत्तर भागामध्ये कुरनूर ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांचे लक्ष लागले होते. याठिकाणी युवानेते व्यंकट मोरे यांची सत्ता पुन्हा आली आहे. या गटाला अकरा पैकी आठ जागा मिळाल्या आहेत.त्यांच्या विरोधात चार पॅनल उभे होते.त्यामध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या.प्रभाग चार मध्ये व्यंकट मोरे
यांनी माजी सरपंच अमर पाटील यांचा पराभव केला तर वार्ड एकमध्ये स्वामीराव पाटील यांचे चिरंजीव बाबासाहेब पाटील यांचा विद्यमान सरपंच वत्सलाबाई मोरे यांनी पराभव केला.कल्याणशेट्टी समर्थक
राहुल काळे यांच्या पॅनेलला एकही
जागा याठिकाणी मिळाली नाही.
तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये लक्षवेधी निवडणुका झाल्या. प्रत्येक पॅनल प्रमुख या निवडणुकीत साम ,दाम, दंड अशाप्रकारे अनेक गोष्टीचा वापर करून विजयासाठी कंबर कसली होती. विजयानंतर प्रत्येकाने जल्लोष करत गावाकडे पाऊल ठेवले. मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्ते पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांची गर्दी दिसून आली.ज्या गावात पॅनल विजयी झाले
त्यांनी जल्लोष केला तर ज्यांचा पराभव झाला त्यांनी या परिसरातून काढता पाय घेतला.

हन्नूरमध्ये कल्याणशेट्टी
– भरमशेट्टी यांचे वर्चस्व

हन्नूरमध्ये गेल्यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाची सत्ता होती. यावेळी मात्र त्या ठिकाणी कल्याणशेट्टी आणि विरोधी विश्वनाथ भरमशेट्टी हे गट एकत्र आले होते.त्यांच्याविरुद्ध चंद्रमणी बाळशंकर यांच्या गटाने पॅनल केले होते. मात्र या पॅनलचा अक्षर:शा धुव्वा उडाला.
या ठिकाणी त्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.सर्वच्या सर्व अकरा जागांवर कल्याणशेट्टी आणि भरमशेट्टी गटाचे वर्चस्व राहिले.

६२ पेक्षा अधिक गावात
भाजपची सत्ता

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकुण ८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ६२ पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कार्यकर्तांचा विजय झालेला आहे. भारतीया जनता पार्टीच्या विचारांना तालुक्यातील जनतेने चांगला कौल दिलेला आहे.१४ बिनविरोध झाले होते.बिनविरोध व उर्वरित मिळुन ६२ पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भाजपाच्या विचारांच्या कार्यकर्ताचा विजय झाला आहे.सर्व विजयी उमेदवारांचे
अभिनंदन.

सचिन कल्याणशेट्टी,भाजप आमदार

६२ गावांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व

अक्कलकोटमध्ये ७२ पैकी ५० तर दक्षिणमध्ये १२ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.या निकालातून एकूण ६२ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आले आहेत.जेऊर,कुरनूर, चपळगाव, सापळे, बादोला, बबलाद, बोरामणी, मुस्ती,तांदुळवाडी शिंगडगाव आदी गावांवर महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
प्रस्थापित झाले आहे.

सिद्धाराम म्हेत्रे,माजी राज्यमंत्री

चार ग्रामपंचायती
सेनेच्या ताब्यात

अक्कलकोट तालुक्यातील
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असून
कल्लहिप्परगे,मिरजगी,हालहळ्ळी,डोबंरजवळगे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत तसेच तालुक्यातील शिवसेनेचे बारा ग्रामपंचायत सदस्याचें बिनविरोध निवड झाले आहेत.त्याशिवाय अन्य गावात देखील शिवसेनेचे ४५ उमेदवार निवडून आले आहेत.

संजय देशमुख,शिवसेना तालुकाध्यक्ष

रिपाईची तालुक्यात
चांगली मुसंडी

अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीमध्ये रिपाई प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे १२ बिनविरोध व २२ सदस्य हे निवडुन आले आहेत असे एकुण ३४ उमेदवार आमचे निवडून आले आहेत.

अविनाश मडिखांबे, तालुकाध्यक्ष आरपीआय

२५ ते ३० राष्ट्रवादीचे सदस्य

कोळीबेट, ममदाबाद,सांगवी,साफळा, चुंगी,किणीवाडी,बणजगोळ,बासलेगाव,
बादोला आदी गावातील २५ ते ३० सदस्य हे आम्हाला मानणारे आहेत.राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.पण तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे.

दिलीप सिद्धे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!