ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरण परिसरात आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी, वन्यजीव सप्ताह विशेष

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चाललेला आहे.

धरण परिसरात अतिशय दुर्मिळ पक्ष्याच्या नोंदी झालेल्या आहेत. कुरनूर धरणाचा परिसर, झाडीझुडपी, धरणात बेटासारखा भाग, डोंगराळ परिसर यामुळे देश विदेशातील पक्ष्यांना आकर्षित करत आहेत. चपळगावातील वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ यांनी पहिल्यांदा या कुरनुर धरण परिसरात छोटा क्षत्रबलाक पक्ष्याची नोंद व छायाचित्रण केले आहे. रविवार दि.27 रोजी ऋतुराज कुंभार, महादेव डोंगरे, रत्नाकर हिरेमठ, सचिन पाटील, नीलकंठ पाटील, निलेश भंडारी, सुशांत कुलकर्णी, संतोष धाकपाडे, विनय गोटे आणि अजय हिरेमठ आदीसोबत पक्षी निरीक्षण करत असताना अतिशय कमी प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी दिसलेला आणि कुरनुर धरण परिसरात पहिल्यांदाच या पक्ष्यांची नोंद झाली आहे.
छोटा क्षत्रबलाक याला इंग्रजीत Lesser Adjutant Stork असे म्हणतात.आकारामध्ये गिधाडपेक्षा मोठा असतो, केरळ, बांगलादेश, ईशान्य भारत आणि श्रीलंका इथे हा पक्षी आढळतो, भारतातील इतर राज्यात हा पक्षी सहसा आढळत नाही.हा निवासी असून स्थानिक स्थलांतर करत असून भटका (Vagrant) या विभागात मोडतो. कमी होत चाललेल्या संख्येमुळे याला धोकाप्रवण (Vulnerable) स्थितीत आलेला आहे.

नर आणि मादी सारखेच दिसतात. शरीराचा वरील भाग धातूवत काळा दिसतो खालील अंग पांढरा आहे. हा पक्षी एकटा राहणारा, जिथे विपुल पाणी आहे अश्या ठिकाणी आढळतो. याचे खाद्य मासे, बेडूक, सरपटणारे प्राणी असून, नोव्हेंबर ते जानेवारी याचा विणीचा हंगाम आहे.धरणाच्या परिसरात छोटा क्षत्रबलाक दिसल्याने वन्यजीव प्रेमी आणि पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!