अक्कलकोट, दि.१२ : सध्या अक्कलकोट तालुक्यात उजनीच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे पण कुरनूर धरण आणि एकरुख योजनेचे मुळ श्रेय हे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांनाच जाते.सुप्रमासुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे,असे स्पष्टीकरण पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी केले.
उजनीच्या पाण्यावरून सध्या तालुक्यात मोठा श्रेयवाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद झाली.यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,जेष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी उपस्थित होते.पुढे बोलताना मोरे म्हणाले की,अक्कलकोट तालुक्यातील १० हजार ११० हेक्टर क्षेत्र आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७ हजार २०० हेक्टर क्षेत्र असे एकूण १७ हजार ३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी स्व. आमदार बाबासाहेब तानवडे यांनी युती शासनाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून एकरुख उपसा सिंचन योजनेला दि.२१ डिसेंबर १९९६ रोजी
८७ कोटी ४८ लाख रुपये खर्चाच्या योजनेला प्रशासकीय मान्यता घेतली. तदनंतर या कामाचे टेंडर निघाले.वर्कऑर्डर झाल्या व कामाला सुरुवात झाली.काम चालू असताना २५ जानेवारी १९९८ रोजी आमदार बाबासाहेब तानवडे यांचे अपघाती निधन झाले आणि त्यानंतर
सहा महिन्यांनी अक्कलकोट विधानसभेची पोटनिवडणूक झाली.पुढे पोटनिवडणुकीमध्ये सिद्धाराम म्हेत्रे हे आमदार झाले
व नंतर त्यांनी या योजनेचा पाठपुरावा केला ही वस्तुस्थिती आहे.त्यावेळी युती सरकार सत्तेवरून जात असताना एकरुख उपसा सिंचन योजनेला तात्पुरती स्थगिती मिळाली होती व परत ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा करून ही स्थगिती उठवली व योजनेच्या कामाला परत सुरुवात झाली.२००९ सालापर्यंत हे काम वेगाने सुरू होते. २००९ नंतर विधानसभेची निवडणूक होऊन सिद्रामप्पा पाटील आमदार झाले या कामाला त्यांनी सुद्धा पाठपुरावा करून थोडा निधी मिळवला.तद्नंतर २०१४ – १५ मध्ये सत्ता परिवर्तन होऊन भाजपाचे सरकार आले व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळी निवड झाली.त्यावेळी फडणवीस यांनी कुरनूर धरणाचा दौरा केला होता. त्यावेळी या योजनेची सविस्तर माहिती तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यासमोर मांडली. त्यानंतर दि.२२ सप्टेंबर २०१५ रोजी वर्षा बंगल्यावर जाऊन तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एकरूख सिंचन योजनेचे निवेदन त्यांना दिले त्या निवेदनावर सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश झाले आणि हे निवेदन पत्र पुढे तीन महिन्यांमध्ये सोलापूरच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयाकडे आले व त्यांना एकरूख उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तात्काळ तयार करावा व तो महामंडळास सादर करावा,
अशी विनंती केली. तिथल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव तयार केला आणि हा प्रस्ताव २०१६ साली महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या कार्यालयात हाप्रस्ताव गेला. तिथे दोन महिने या प्रस्तावाची छाननी झाली नंतर
तो कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गोटे यांच्याकडे गेला. त्यांच्याही कार्यालयात या प्रस्तावाची तपासणी झाली व तिथून तो प्रस्ताव जवळ जवळ सात आठ महिने ह्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी चालू होती.तिथून दि.४ ऑगस्ट २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाला महामंडळातून प्रस्ताव सादर करण्यात आला.त्यानंतर सकारात्मक शिफारस करून तत्कालीन नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या कार्यालयात गेला व त्यांच्या कार्यालयांची तपासणी होऊन हा प्रस्ताव वित्त विभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव डी.के जैन यांच्याकडे गेला आणि त्यांनी या प्रस्तावाचे संपूर्ण तपासणी करून अंतिम मसुदा तयार केला तदनंतर तत्कालीन अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आपण बैठक लावावी, अशी विनंती केली.ती बैठक दि.२३ एप्रिल २०१८ रोजी मंत्रालयात झाली व ४१२ कोटी रुपयाच्या वाढीव अंदाजपत्रकासह या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि या कामाचे एक महिनाभरात आदेश सोलापूरच्या कार्यालयाला प्राप्त झाले.पुढे ४७ कोटी रुपये निधी वर्ग झाला आणि ताबडतोब एकरुख सिंचन योजनेच्या उर्वरित कामाला सुरुवात झाली आज हे काम अंतिम स्वरूपात आलेले आहे आणि एक महिन्यात या संपूर्ण कामाची चाचणी घेण्यात येणार आहे.हे जनतेच्या पुढे वास्तव मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. अक्कलकोट तालुका १०० टक्के सिंचनाखाली आणण्यासाठी यापुढे मी प्रयत्नशील राहणार असून वेगवेळे साठवण तलाव पाझर तलाव,
एमआय टॅंक असे प्रकल्प या तालुक्यात राबवणार आहे.अजूनही ज्या ज्या ठिकाणी सिंचनाचे पॉईंट उपलब्ध असतील तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांनी आम्हाला सुचवावे व ताबडतोब त्याचा सर्व्हे करून अंदाजपत्रक तयार करण्यात येतील व ती योजना मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.एकरुख उपसा सिंचन योजनेच्या सुप्रमा मंजुरीचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार,तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन,माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,
सर्व पत्रकार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सर्व अधिकारी या सर्वांचे आहे,
असे मोरे म्हणाले.
श्रेय लाटण्याचा
प्रयत्न
एकरूख सिंचन योजना असेल कुरनूर धरण असेल हे दोन्ही सिंचनाचे कामे
स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या दूरदृष्टीतून झालेली आहेत परंतु त्यांचे नाव न घेता या कामाचे
श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत
आहे.
आनंद तानवडे,जि.प सदस्य