ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार

सोलापूर : करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करु, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले.

करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.  यावेळी ते बोलत होते.  कंदर येथे केडी एक्सपोटर्स कंपनीच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसिलदार समीर माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, उद्योजक किरण डोके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, कंदरच्या केळीचा ब्रँड विकसित झाला आहे.  ‍  तो अधिकचा प्रसिध्द होण्यासाठी तसेच उत्पादकता वाढावी, उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित करुन आराखडा तयार केला जाईल.

यावेळी विविध शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.  यामध्ये कंदर येथे खत, पाणी, माती तपासणी कार्यशाळा व्हावी, कंदर आणि परिसरासाठी स्वतंत्र फीडर असावा, दिवसा आठ तास वीज पुरवठा असावा.  उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांचा विकास व्हावा, रस्ते विकास व्हावा, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे उपकेंद्र करमाळा तालुक्यात व्हावे,  अशा मागण्या मांडल्या.   जमीन बिगरशेती करताना विविध अडचणी येतात,  कृषी सहाय्यक मुक्कामी राहत नाहीत,  या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी श्री. शंभरकर यांनी केळीच्या विविध शेती प्लॉटला भेटी दिल्या.  केळी पॅकिंग युनिट, चिलींग युनिटची पाहणी केली.  निर्यातक्षम केळ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी काय करता येईल याबाबत महिंद्रा लाईफस्पेस कंपनी, मदर डेअरी, कृषीरत्न पुरस्कार विजेते आनंद कोठडिया यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!