सोलापूर : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आज शासनाच्या निर्देशानुसार चार ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत निरीक्षण केले, त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
आज जिल्ह्यात उपजिल्हा रूग्णालय, अकलूज, ग्रामीण रूग्णालय, बार्शी, प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी आणि महापालिका क्षेत्रात दाराशा हॉस्पिटल येथे कोविड लसीकरणाबाबतचा ड्राय रन घेण्यात आला. होटगी येथील लसीकरण बूथच्या पाहणीवेळी श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी तथा लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगांबर गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.व्ही. मिसाळ, डॉ. सरोज पाटील जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख आदी उपस्थित होते.
लसीकरणाच्या ड्राय रनची पाहणी श्री. शंभरकर यांनी केली. जिल्ह्यात होणाऱ्या चार ठिकाणचे अनुभव काय आहेत, सर्व पद्धती अवलंबून लसीकरणाला किती वेळ लागला, सोयी-सुविधा यांची माहिती घेऊन काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. शिवाय रूग्णांना काही लक्षणे दिसल्यास रूग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.
श्री. स्वामी म्हणाले, आज प्रत्यक्ष कोरोनाची कशी दिली जाते, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांनी रूग्णाच्या प्रवेशापासून ते बाहेर जाण्यापर्यंतचे निरीक्षण नोंदविले. तपासणी, पडताळणी, लस, रूग्णाला सूचना आणि अर्धा तास प्रतिक्षेत ठेवण्यात आले. आज याठिकाणी 25 रूग्णांना लस दिल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आलेल्या अडचणींच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत, त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.
डॉ. जाधव म्हणाले, आज कोरोना लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यामध्ये अडचणी काय आल्या, त्यातून सकारात्मक काय करता येणार याची निरीक्षणे सर्व पथकांनी नोंदवली आहेत. लसीकरणासाठी प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. एका रूग्णाला साधारणपणे 5 ते 6 मिनिटे वेळ लागला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांनी लसीकरण प्रात्यक्षिकाची माहिती घेतली.