ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खुशखबर | कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

नवी दिल्ली : सीरम इंस्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापरासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. या व्यतिरिक्त झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लशीला देखील तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याची मंजुरी देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची.. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारलं असता, ”आम्ही कधीही अशा लसीला संमती देणार नाही जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये.” असं सोमानी यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!