ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गाव पातळीवरील बंडोबांना ‘थंड’ करण्यासाठी पॅनल प्रमुखांचे प्रयत्न ! अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत.त्यासाठी ४ जानेवारी ही अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याआधी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ज्यांनी पॅनल अंतर्गत बंडखोरी केली आहे त्यांना ‘थंड’ करण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. गटा अंतर्गत असलेली नाराजी आणि त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न हे गाव पातळीवरील नेत्यांकडून सुरु आहेत.अर्जांची छाननी गुरुवारी पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता गावागावात सध्या अर्ज माघार घेण्यासाठी दबावतंत्र अवलंबण्यात येत आहे. काहीनी तर निवडणूक लढविण्याचा पक्का निर्णय केल्याने पॅनेलची पुढील दिशा ठरवत आहेत तसेच काहीजण ज्या उमेदवाराकडून आपल्या पॅनेलला धोका आहे अशा उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आग्रह धरत आहेत.
जितक्या निवडणुका मोठ्या तितका मतदारांचा संपर्क कमी,जितक्या खालची निवडणूक असेल तितका मतदारांचा संपर्क हा थेट असतो. गाव पातळीवर तर प्रत्येक व्यक्तीला आणि त्याच्या मताला महत्त्व असते म्हणून प्रत्येक पॅनल प्रमुख हा गावातील मतदारांची गोंजारून तो त्यांच्याशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे.यावेळी तर अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आत्तापर्यंत एकही ग्रामपंचायत अधिकृत पूर्णतः बिनविरोध झालेली नाही मात्र काही गावात अजूनही बिनविरोधची चर्चा आहे. याबाबतही खरे चित्र ४ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.आगामी निवडणुकांसाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका या फार महत्त्वाच्या मानल्या जातात अशा परिस्थितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवसेनेचे संजय देशमुख आदी नेते मंडळींनी गाव पातळीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे आपल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन निवडणुकीत ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता या प्रयत्नाला कितपत बळ मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी दोन दिवस उमेदवार माघार घेण्याचे आहेत त्यासाठी प्रत्येक पॅनल प्रमुख हा वेग वेगळ्या क्लुप्त्या लढवत आहे.काही जणांनी तर आपला उमेदवार ऐनवेळी माघार घेईल या भीतीने उमेदवारांना बाहेर पाठवले हे. गॉडफादर मार्फत वेगवेगळ्या माध्यमातून विरोधी उमेदवारांना दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.याबाबतचे खरे चित्र हे सोमवारी स्पष्ट होईल.

निवडणुकीत
मोठी चुरस

गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये मोठी चुरस असते.या निवडणुकांमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात त्याच्या वादाचे परिणाम देखील या निवडणुकीत होत असतात त्यातुन विजय आणि पराभव ठरत असतो त्यामुळे प्रत्येक जण या सर्व बाबींची काळजी घेऊनच निवडणूक जिंकण्यासाठी
प्रयत्न करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!