मुंबई | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस – राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली असून शिवसेनेला एकाकी पाडलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, हे अतिशय चुकीचं आहे,” असे म्हणत कोल्हापुरातील खानापूर गावातील नव्या राजकीय समीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला.
स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आघाडीची राज्यात चर्चा होऊ लागल्यामुळे थेट वरिष्ठ नेत्यांनासुद्धा या खानापुरातील निवडणुकीची दखल घ्यावी लागली आहे. या निवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता, “येथे झालेली आघाडी ही अत्यंत चुकीची आहे. आम्ही तेथील लोकांना वरिष्ठांकडून सूचना दिल्या आहेत,” असं स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे झालं त्याचं समर्थन कुणीही करणार नही असंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे.
खानापुरात आघाडीत बिघाडी झाल्यानंतर अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना सूचना दिल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्यातरी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपशी युती केलेली असून येथे शिवसेना हा पक्ष एकटा पडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे खानापुरातील स्थानिकांना सूचना दिल्यानंतर आता य़ेथे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.