ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चरित्रग्रंथांच्या वाचनातून व्यक्तिमत्त्वाला आकार येतो : डॉ.कोमरपंत ; दुरदृश्य प्रणालीद्वारे संगमेश्वरमध्ये मराठी विभागाचा वर्षारंभ कार्यक्रम

 

सोलापूर,दि.१ : साहित्यातील
थोर व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रग्रंथ वाचनातूनच विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. प्रेरणादायी चरित्रग्रंथ वाचनातून,अभ्यासपूर्ण उत्तम भाषणाच्या श्रवणातून आपोआप व्यक्तिमत्व आण सृजनाच्या प्रेरणा विकसित व्हायला मदत होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन, लेखन, श्रवण, चिंतन करीत राहावे,असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी केले.

ते संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) , मराठी विभाग आयोजित वर्षारंभ समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दूरदृश्यप्रणालीच्या साह्याने झालेल्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.शोभा राजमान्य, उपप्राचार्य डी.एम.मेत्री, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुहास पुजारी प्रा.डॉ. महादेव देशमुख यांच्यासह भाषाप्रेमी विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.

प्रारंभी प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला आणि डॉ. कोमरपंत यांचा यथोचित परिचय करून दिला. त्यानंतर डॉक्टर कोमरपंत यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. ते पुढे म्हणाले,”आधुनिक वाङ्मयाच्या कालखंडात विशेषतः विसाव्या शतकात लोकमान्य टिळकांच्या लेखनापासून ते मारुती चितमपल्ली यांच्यापर्यंतच्या लेखकांनी निसर्ग, ग्रामीण, दलित, स्त्रीवादी साहित्याच्या विविध प्रवाहांचे जे लेखन केले ते वाचले तर असे लक्षात येईल की, हे लेखन त्या प्रतिभावंत लेखकांनी केवळ स्वांन्त सुखासाठी केले नसून राष्ट्रीय, सामाजिक, निसर्ग आणि व्यक्तिस्वातंत्र्यविषयक जाणिवा समाजजीवनात वाढीस लागावे म्हणून केले आहे. हे आपणास एकदा समजले की सृजनात्मक साहित्याचे मूल्य आपल्या जीवनात किती मोठे आहे, हे कळून येईल आणि ते विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे अशी मी अपेक्षा करतो.”
या व्याख्यानानंतर प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य यांनी अध्यक्षीय समारोप केला. या दूरदृश्यप्रणाली च्या साह्याने झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष पवार यांनी केले. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!