चेन्नई: चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळण्यात येत असलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने १ बाद ३९ धावा केल्या आहे. अखेरच्या आणि पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ३८१ तर इंग्लंडला विजयासाठी ९ विकेटची गरज आहे.
भारताने पहिल्या डावात ३३७ धावांपर्यंत मजल मारली. तर इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १७८ धावांवर आटोपला. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. रोहित पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि गिल यांनी दिवस संपला तेव्हा टीम इंडियाने १ बाद ३९ धावा केल्या. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ३८१ धावा कराव्या लागतील. तर इंग्लंडलाही जिंकण्यासाठी 9 विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पाचव्या दिवशी नक्की काय निकाल लागणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.