ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जनसेवक स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांची आज २३ वी पुण्यतिथी ….

अक्कलकोटचे भारतीय जनता पक्षाचे पहिले आमदार स्वर्गीय बाबासाहेब तानवडे यांचा आज २३ स्मृतिदिन.
ज्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील भाजपचा विचार करतो त्यावेळी तानवडे यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.कारण त्यावेळी त्यांनी जी भाजपची पाळेमुळे रोवली ती आज देखील भक्कम स्वरूपात उभी आहेत. खरे तर भाजपला आज अच्छे दिन आले आहेत ते केवळ त्यांच्या त्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच. २५ जानेवारी १९९८ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.त्यावेळी तालुक्याला फार मोठा हादरा बसला.अजूनही ते गेले असे वाटत नाही.कारण अण्णा एक सुसंस्कृत राजकारणी होते. केवळ अक्कलकोट नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी अगदी कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले होते. भाजप म्हणजे तानवडे आणि तानवडे म्हणजे भाजप अशा प्रकारची ओळख त्यांनी निर्माण केली होती.सार्वजनिक जीवनात आज चारित्र्य, मूल्य, नैतिकता, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्त याची फार मोठी उणीव जाणवते पण अण्णांच्या राजकीय वाटचालीकडे जर पाहिले तर एक दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे कार्य उभे राहिले आहे. एक शुद्ध चारित्र्याचा प्रज्ञावंत राजकारणी म्हणून आजही बाबासाहेबांचे नाव घेतले जाते. तालुक्यातील प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता हा तानवडे यांचे नाव घेतो ज्यावेळी ते आमदार झाले त्यावेळी देखील त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे करून खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. तालुक्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवत असताना
अनेक परिवर्तनवादी निर्णय अंगीकारून
शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक जीवनात वैचारिक क्रांती घडवली.अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण,आयटीआय,हिळळी पाणीपुरवठा योजना,स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीला मिळालेला तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल ही सर्व कामे त्यांच्या कार्याची ओळख करून देतील.कारण तीच कामे आजही प्रकर्षाने दिसून येतात. स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे हे एक भाजपाचे प्रामाणिक व सच्चे कार्यकर्ते तर होतेच पण निष्ठा कशी असावी आणि कार्यकर्ते कसे जोडावेत त्याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.तानवडे यांनी गावागावात भाजपची फळी उभा करून बहुजन समाजाला भाजपच्या जवळ आणण्याचे काम केले.ज्यावेळी अक्कलकोट तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तानवडे यांनी केलेली कामे कोणालाही विसरता येणार नाहीत. आज त्यांचा वारसा जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि युवा नेते प्रसन्न तानवडे हे चालवत आहेत.तेही तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेले व्यक्तिमत्व. कधीही त्यांनी मोठेपणाचा आव आणला नाही फक्त पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना ताकद देणे हेच काम ते करत राहिले
म्हणून आज गावागावात तालुक्यात आणि जिल्ह्यात अक्कलकोटच्या भाजपचा जेव्हा विषय निघतो. त्यावेळी तानवडे यांचे नाव आदराने घेतले जाते.आज त्यांची २३ वी पुण्यतिथी. म्हणून त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.

अमित कोथमीरे,शिरवळ

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!