ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘या’ इशाऱ्याने पुन्हा फोडला घाम ; दिला धोक्याचा इशारा

जिनेव्हा । कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तो जाऊन धडकला आहे. नुसताच धडकला नाही, तर माणसाच्या प्रगती, संशोधनाला तो अवाहन देतो आहे. दरम्यान,  कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर आ वासून उभं आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, अशी धोक्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होण्याच्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ विषाणू स्वत:मध्ये बदल करतो. त्यामुळे औषध प्रभावी ठरत नाही. विषाणूची प्रतिकारशक्ती वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवते.

अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढणं कोरोना महामारीप्रमाणेच धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम यांनी म्हटलं. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे वैद्यकीय क्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान आहे. एका शतकाची मेहनत यामुळे वाया जाईल. आरोग्य क्षेत्रासाठी हा अतिशय मोठा धोका असेल. विषाणूनं स्वत:मध्ये बदल केल्यास औषध त्यासमोर फारसं प्रभावी ठरत नाही. यामुळे लहान जखमा किंवा संक्रमणदेखील भीषण स्वरूप धारणं करू शकतं, अशी भीती ट्रेडोस यांनी व्यक्त केली.

माणूस आणि पशूंवर अधिक प्रमाणात औषधांचा वापर होत असल्यानं गेल्या काही वर्षांत अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढल्याचं ट्रेडोस यांनी सांगितलं. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स कोणताही आजार नाही. मात्र तो आजाराइतकाच किंबहुना एखाद्या महामारीइतकाच धोकादायक आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रानं एका शतकात केलेल्या प्रगतीवर पाणी फिरेल. आज अतिशय सहजपणे होणाऱ्या संक्रमणांवरील उपचारदेखील अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे होऊ शकणार नाही, असं ट्रेडोस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!