सोलापूर,दि.23: सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि वेळेत होत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज दिली.
त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात 59 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असून त्यांना सरासरी 25 ते 30 मेट्रिकटन ऑक्सिजनची गरज असते. या मागणीनूसार जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी 26.56 मेट्रिकटन ऑक्सिजन पुरवठा झाला त्यापैकी 21.79 मेट्रिकटन ऑक्सिजन वापरला गेला. आज 19.08 मेट्रिकटन ऑक्सिजनचा शिल्लक साठा आहे.
जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलना आर्निकेम आणि एलआर इंडस्ट्रिजकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. टेंभूर्णी येथे एसएस बॅग्ज ॲण्ड फिलर्स ही कंपनी नव्याने सुरु करण्यात आली आहे. याचबरोबर आवश्यकता भासल्यास मुंबईयेथील लिंडा कंपनीकडे टॅंकर पाठविल्यास ते लिक्विड ऑक्सिजन तत्काळ उपलब्ध करुन देतात. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन संबंधित कंपनीच्या संपर्कात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा कोठेही तुटवडा नाही. जिल्ह्यातील कोणत्याही हॉस्पिटलला ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांनी तत्काळ औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त भालेराव (9405783636) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ही श्री.देशमुख यांनी केले.