ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यातील दस्तांचे स्कॅनिंगचे काम पूर्णत्वाकडे

सोलापूर : राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व मूळ दस्ताऐवजांचे (अभिलेखे) स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात भूमी अभिलेख खात्याकडे असलेले सर्व मूळ दस्तऐवज (अभिलेखे) आणि तहसील विभागाकडील उतारे एका वर्षात 100 टक्के स्कॅन झाले असून तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जमिनीची मोजणी करून देणे आणि नगर भूमापन (सिटी सर्वे) झालेल्या मिळकतीवर फेरफार नोंदणी घालण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयाकडे असलेली सातबारा उतारे, फेरफार, नमुना 8 अ, कडई पत्रक, इनाम पत्रक, जन्म-मृत्यू नोंदी या कागदपत्रांचेही काम पूर्ण झाले आहे. भूमी अभिलेख आणि तहसीलदार कार्यालय असे एकूण 1 कोटी 33 लाख 78 हजार 767 अभिलेखे आहेत. या सर्व अभिलेख्यांचे 100 टक्के स्कॅनिंग झाले असल्याचे श्री. सानप यांनी सांगितले.

भूमी अभिलेख कार्यालयाकडे इंग्रजांच्या काळापासूनचे दस्त (अभिलेखे) आहेत. दस्त जीर्ण झाल्याने हाताळता येत नाहीत. नागरिकांना याची नक्कलही देता येत नाही. जीर्ण झालेले, फाटलेल्या दस्तांचे पुनर्लेखन केले असून त्याचेही स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

ग्रामीण भागातील दस्त (अभिलेखे)

टिपण बुक, आकार फोड पत्रक, आकारबंद, योजना पत्रक (एकत्रीकरण), जबाब फाईल, शेत पुस्तक (फिल्ड बुक), गाव पीसी (गावचा एकत्र पत्रव्यवहार), ताबे पावती, पोट हिस्सा पत्रक आणि फेअर स्केच (नकाशा) या सर्व दस्तांऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

तर नगर भूमापनकडे असलेल्या मिळकत पत्रिका, वसलेवार बुक (घराची लांबी-रूंदीसाठी), चौकशी नोंदवही, गाव पीसी यांचेही स्कॅनिंग झाले आहे. हे सर्व स्कॅनिंग इ-रेकॉर्ड मेटाडाटा अपडेशनमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी कार्वी एजन्सीची मदत घेण्यात आली आहे.

स्कॅनिंग झालेल्या अभिलेख्यांची आकडेवारी

माढा तहसील (8 लाख, 93 हजार 252), माढा भूमी अभिलेख (1 लाख, 6 हजार 182), उत्तर सोलापूर तहसील (5 लाख, 90 हजार 511), उत्तर सोलापूर भूमी अभिलेख (70 हजार 91), मोहोळ तहलील (12 लाख 99 हजार 402), मोहोळ भूमी अभिलेख ( 2लाख 8 हजार 478), सांगोला तहसील (15 लाख, 17 हजार 549), सांगोला भूमी अभिलेख (1 लाख 65 हजार 859), अक्कलकोट तहसील (9 लाख 92 हजार 46), अक्कलकोट भूमी अभिलेख (1 लाख 83 हजार 442), दक्षिण सोलापूर तहसील (7 लाख, 43 हजार 220), दक्षिण सोलापूर भूमी अभिलेख (66 हजार 520), बार्शी तहसील( 10 लाख 69 हजार 417), बार्शी भूमी ‌अभिलेख (1 लाख, 81 हजार 357), करमाळा तहसील (6 लाख 68 हजार 557), करमाळा भूमी अभिलेख (1 लाख, 39 हजार 851), मंगळवेढा तहसील (6 लाख, 48 हजार 752), मंगळवेढा भूमी अभिलेख (1 लाख 11 हजार 274), पंढरपूर तहसील (15 लाख, 17 हजार 791), पंढरपूर भूमी अभिलेख (2 लाख, 25 हजार 975), माळशिरस तहसील ( 15 लाख, 38 हजार 489), माळशिरस भूमी अभिलेख (2 लाख, 99 हजार 431) आणि सोलापूर नगर भूमापन कार्यालयाकडील (1 लाख, 41 हजार 321) असे एकूण 1 कोटी 33 लाख 78 हजार 767 अभिलेख्यांचे स्कॅनिंग झाले आहे.

अभिलेखे स्कॅनिंगचे फायदे

• स्कॅनिंग झाल्यानंतर नागरिकांना केवळ गट नंबर, खाते नंबर, सर्व्हे नंबर टाकल्यास एका क्लिकवर माहिती दिसणार.

• जीर्ण अभिलेखे फाटण्याची भीती नाही. ते पाहता येणार.

• कार्यालयात जाण्याची आणि हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही.

• वेळ, पैशाची बचत होणार.

• बनावटगिरी आणि दलालाला आळा बसेल.

• कधीही आणि कोठेही नेटद्वारे पाहता येईल.

अभिलेखाबाबतचे कामकाज कसे चालते

•अभिलेखे स्कॅनिंग करून महा भूमी अभिलेख पोर्टलवरील ई-अभिलेखे सॉफ्टवेअरमध्ये घेतले जातात.

•अभिलेखे जेपीजी फॉरमॅटमधून मेटाडेटा वर्कमध्ये पीडीएफ करून सेव्ह केले जातात.

•सॉफ्टवेअरमध्ये घेतल्यानंतर शिरस्तेदार, वरिष्ठ लिपीक तपासणी करतात.

•कार्यालय प्रमुख फेरतपासणी करतात.

 

सध्या संपूर्ण अभिलेख्यांचे स्कॅनिंग झाले असून पूर्ण झालेल्या कामाची गुणवत्ता तपासणीचे काम चालू आहे. गुणवत्ता तपासून झाल्यानंतर काही दुरूस्ती असेल तर केली जाते. दुरूस्तीनंतर जिल्ह्यामार्फत प्रस्ताव हार्ड डिस्कमधून शासनाला (जमाबंदी कार्यालय) सादर केला जातो. तिथे तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार असून त्यानंतर महाभूमी अभिलेख पोर्टलवर जिल्हानिहाय डाटा लोड केला जाणार आहे. यानंतर जनतेला/खातेदारांना आपल्या दस्तांची माहिती ऑनलाईन दिसणार आहे. मात्र दस्तांची (अभिलेख्यांची) प्रिंट किंवा प्रमाणित प्रत हवी असेल तर शासकीय फी भरावी लागेल, असेही श्री. सानप यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!