ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यातील शेतशिवाऱ्यात वाढला वेडा राघू पक्ष्यांचा मोठा वावर

सोलापूर: वेडा राघू, किवंडा पोपट, पाणपोपट असे विविध नामावळी असलेल्या वेडा राघू या पक्ष्यांचा मोठा वावर सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात आढळत असल्याची माहिती पक्षी निरीक्षकांकडून मिळाली आहे.

भारतातील निवासी पक्षी असलेल्या वेडा राघूला इंग्रजीत ग्रीन बी ईटर असे म्हणतात. नीळकंठ, खंड्या व सुतार या  पक्ष्यांच्या कुळातील पोपटी रंगाच्या हे पक्षी सध्या विपुल प्रमाणात आढळून येत आहेत.

सुडौल व सडपातळ शरीरयष्टी आणि शेपटीला असणारी मधली दोन दाभणासारखी पिसे हे वेडा राघू पक्ष्यांना ओळखण्याची खूण आहे. हे पक्षी भारतभर वर्षभर आढळतात; मात्र भारतीय  उपखंडात  होणाऱ्या खाद्याच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थानिक स्थलांतर करतात. पश्चिम महाराष्ट्रात  एरवी अत्यल्प संख्येने वावराणारे वेडा राघू थंडीच्या काळात मात्र लक्षणीय संख्येने आढळून येतात. या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य मधमाशी आहे. मधमाशांबरोबर हे पक्षी  टोळ, फुलपाखरे, पावसाळी किडे व इतर कीटकांना पण आपले भक्ष्य ठरवतात. आपल्या अणुकुचिदार चोचीने हे पक्षी हवेतून उडणाऱ्या भक्ष्य टिपण्यात तरबेज असतात. दिवसभर खाद्य मटकाऊन झाल्यानंतर शेकडोंच्या संख्येने मनुष्य वस्ती किंवा एखाद्या पाणवठ्याच्या जवळच्या डेरेदार झाडावर मुक्काम करतात.  सकाळी अन्नशोधार्थात  विखरून जाण्या अगोदर काही काळाकरिता हे पक्षी विद्युत तारेवर बहुसंख्येने सूर्यस्नान घेण्यासाठी एकमेकांना बिलगून बसतानाचे दृश्य मनमोहक असते.

हे पक्षी वैशिष्ट्य पूर्ण घरटे बनवतात. विणीच्या काळात (फेब्रुवारी ते मे) हे पक्षी जोडीने उघड्या जमीन वा टेकडी आणि वाळुकामय जमीन इत्यादी ठिकाणी सामान्यपणे एक मीटर खोलीचा बोगदा तयार करतात. या बोगद्याच्या आतील टोकाला रूंद गोलाकार भाग तयार करतात. यात मादी चार ते सहा पांढरी शुभ्र लांबगोलाकाराच्या अंडी घालते. नर व मादी दोन्ही मिळून अंडी पिल्लांची देखभाल करतात.

या वर्षी झालेल्या चांगल्या पाउसामुळे जिल्ह्यात खरीपाची पिके जोमाने  बहरल्याने कीटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या कीटकांवर ताव मारण्यासाठी वेढा राघू हे पक्षी थव्याच्या थवेने स्थानिक स्थलांतर करून आले आहेत. खरीप संपल्यावर हे पक्षी जिकडे खाद्यान्न उपलब्ध होईल तिकडे स्थलांतर करत निघून जातात.”
– डाॅ. अरविंद कुंभार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!