सोलापूर, दि.९ : जिल्हयात पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस
दिली जाणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कोरोना लसीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत शंभरकर बोलत होते.या बैठकीत लसीकरणाबाबत नियोजन आणि आराखड्याची माहिती डॉ.शीतल कुमार जाधव यांनी दिली. शंभरकर पुढे बोलताना म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आणि औषधाशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये लसीकरणाबाबत जागरूकता आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस देण्यासाठी डाटा फिडिंगच्या कामाला गती देऊन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व नियोजन 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
जागतिक आरोग्य संघटनेचे सोलापूरचे सल्लागार डॉ. अमोल गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरणाच्या तयारीची माहिती दिली. पुढील आठवड्यात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लसीकरणाबाबत प्रशिक्षण होणार आहे. तसेच जे प्रत्यक्ष लस देणार आहेत, त्यांचे 18 डिसेंबरला प्रशिक्षण होणार असून एका बुथवर 100 जणांनाच लस दिली जाईल. याठिकाणी विविध पाच प्रकारचे सदस्य असणार आहेत.
जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी असे 5 हजार 994 आरोग्य संस्था आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालये, अंगणवाडी कर्मचारी, खाजगी दवाखान्यांचा समावेश आहे. लस देण्यासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचारी 30 हजार 184 अशी आहे. कोल्ड चैनमध्ये आयएलआर-145 आणि डीप फ्रिजींग 201 सध्या उपलब्ध आहेत. व्हॅसिन स्टोरेजची कपॅसिटी 25 लाख 11 हजार ते 29 लाख 30 हजार इतकी आहे. 17 जानेवारीला पोलिओची लस 3 लाख 44 हजार पाच वर्षाच्या आतील बालकांना दिली जाणार आहे. यासाठी 2449 लसीकरण केंद्र, 338 टीम तयार करण्यात आल्या आहेत. ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड रूग्ण असे चार टप्पे केल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.