औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर आता भाष्य केले आहे. आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
“जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल तेव्हा पहाटेची वेळ नसणार आहे. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळणार आहे. त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचं काम सुरू आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,” असंही यावेळी ते म्हणाले.
राज्यात सध्या पदवीधर निवडणुकांची धामधुम आहे. या अनुषंगाने सर्वच पक्षातील नेते प्रचारात गुंतले आहेत. देवेंद्र फडणवीस हेदेखील प्रचारासाठी औरंगाबाद येथे आले आहेत. तिथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर सूचक विधान केलं आहे. ‘या पुढे पहाटे शपथ घेणार नाही, आता या पुढे तुम्हाला योग्य वेळी शपथविधी दिसेल,’ असं म्हणतानाच त्यांनी अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवाय, पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावर पुस्तक लिहिणं सुरु आहे, असंही ते म्हणाले आहेत.