जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार;श्रमिक पत्रकार व क्रिकेट संघटनेच्या शोकसभेत निर्णय
सोलापूर,दि.१ : जेष्ठ क्रीडा पत्रकार जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार असल्याची घोषणा जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबुर्सो यांनी केली.
सोलापूर श्रमिक पत्रकार व जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शोकसभेत ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रातील चालता बोलता इतिहास व सेवानिवृत्तीनंतर पत्रकारिता त्यांनी सांभाळली. पदाधिकारी नसले तरी हिशोब सांभाळल्यामुळे श्रमिक पत्रकार संघास मदत मिळाली, अश्या भावना पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
क्रीडा व क्रिकेट बातम्या करण्यास आणि भाषांतर करण्यास त्यांच्यामुळे शिकलो, असे पत्रकार रवींद्र देशमुख व क्रीडा पत्रकार विरेश अंगडी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
सावा संघटनेच्या व बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेस त्यांनी नेहमीच सहकार्य केले, असे सावाचे महेश अंदेली व बार असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज सलगर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रशिक्षक, पंच व समालोचक अशी तिहेरी भूमिका बजाविणारा खंदा फलंदाज, क्रिकेट बद्दल रास्त अभिमान असलेली व भीष्माचार्य अशी ही व्यक्ती आपल्यातून गेल्यामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. पार्क अध्यायावात झाले परंतु ते पाहण्यासाठी ते इथे नाहीत. क्रीडा क्षेत्रातील छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे, क्रीडा क्षेत्रास दिशा व प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. बातमी उशिरा प्रसिद्ध होईल परंतु देताना दुजाभाव केला नाही. क्रीडा क्षेत्र जिवंत ठेवले. हे करीत असताना गुगली या सदरातून फटकेही मारण्याचे त्यांनी सोडले नाही, अशा भावना सुदेश मालप, अप्पू गोटे, मरगु जाधव, रवींद्र नाशिककर व राजेंद्र माने यांनी व्यक्त केल्या.
यावेळी पत्रकार मनोज व्हटकर, क्रीडा संघटक दिलीप बच्चूवार, सुनील मदन, प्रकाश भुतडा, एम. शफी, के. टी.पवार, पार्वतय्या श्रीराम, विजयकुमार गुल्लापल्ली आदी उपस्थित होते.