ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टीम इंडियातील ‘या’ खेळाडूच्या वडिलांचं निधन ; ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनच्या नियमांमुळे अंत्यविधीला मुकणार

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौर (53) यांचं शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निध झालं.  त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्देवाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात सिडनीत क्वारंटाइनच्या नियमांचं पालन करत आहेत. यामुळे सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता येणार नाहीय.

मोहम्मद सिराजचे वडील रिक्षाचालक होते. हालाखीच्या परिस्थितीत असतानाही केवळ मुलाचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कमाई सिराजसाठी खर्च केली होती. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर संघाकडून खेळणारा मोहम्मद सिराज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. परंतु मुलाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न अधुरं राहिलं.

‘माझा मुलगा देशाचं नाव उज्ज्वल करेल असं माझे बाबा नेहमी बोलायचे आणि मी नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करेन’, अशी भावूक प्रतिक्रिया सिराजनं व्यक्त केली आहे. ‘माझ्यासाठी बाबांनी किती खस्ता खाल्यात याची जाणीव मला आहे. प्रसंगी रिक्षा चालवून त्यांनी माझं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतलीय. बाबांच्या जाण्याचं मला कळलं आणि मला मोठा धक्का बसलाय. माझा खूप मोठा पाठिंबा हरपलाय. भारतासाठी मी खेळावं असं त्याचं स्वप्न होतं आणि माझ्या या दौऱ्यातून त्यांना नक्कीच त्यांना आनंद होईल’, असंही सिराज म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!