मुंबई – अँजिओप्लास्टीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून भाजपवर निशाना साधला आहे. पराभवाबद्दल शिवसेना आत्मचिंतन करेल. हा काही दोष नाही तो गुण आहे. आत्मचिंतनाची वेळ ही बालेकिल्ले गमवणाऱ्यांवर आली आहे. चिंतन आणि आत्मचिंतनाची बैठक त्यांच्याकडे जास्त आहे. आम्ही कृती आणि अॅक्शनवाले, असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.
येत्या निवडणुकांसाठी भाजपकडे मास्टर स्ट्रॅटजी आहे. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. बसून चर्चा करतो, बैठका घेतो. कार्यकर्ते काम करतात. मात्र त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे. जागतिक स्तरावरुन त्यांना मदत मिळते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. तसेच आगामी मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढेल, असे संकेतही राऊतांनी दिले.