नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा सुरू होणार नाहीत, असं सिसोदिया यांनी जाहीर केलंय.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थितीपाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे.
दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे.