दुधनी (गुरुराज माशाळ) : दुधनीच्या इतिहासात प्रथमच यंदा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा केवळ मोजक्या मानकरी आणि देवस्थान पंचकमीटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी मंगळवारी सांयकाळी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या देव-देवतांना तैलाभिषेक करण्यात आला.त्यानंतर आज अक्षता सोहळा पार पडला.
दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेला शंभर वर्षांची परंपरा आहे. दुधनीत दरवर्षी मकर संक्रात निमित्त मोठी यात्रा भरविला जाते, मात्र यंदा कोरोना महामारीमुळे शासनाने मोठी गर्दी होणाऱ्या यात्रावर बंदी घातली आहे आणि या यात्रेस परवानगी पण नाकारली होती. यामुळे देवस्थान पंच कमिटीने यंदाच्या वर्षी दुधनीतील यात्रा रद्द करून केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय देवस्थान पंच कमिटीने घेतला आहे. दरवर्षी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळ्या प्रसंगी मोठी गर्दी असायची. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा पार पडला.
आज सकाळी अक्षतेचे मानकरी ईरय्या पुराणिक यांच्या घरात पोथी-पुराण ग्रंथाची पुजा करण्यात आले. त्या नंतर सिद्धेश्वर मंदिरा समोरील सम्मती कट्ट्याजवळ दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली सद्स्य देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी यांच्या उपस्थितीत, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गिरमल्लप्पा सावळगी, सीद्दण्णा गुळगोंडा, हणमंतराव पाटील, मल्लिनाथ पाटील यांच्या हस्ते सुगडी पुजन करण्यात आले. त्या नंतर अक्षता सोहळ्याचे मानकरी ईरय्या पुराणिक आणि चन्नवीर पुराणिक सम्मती वाचनास सुरुवात केली.
यंदाच्या वर्षी पोलिस प्रशासनाने नंदीध्वज मिरवणुकीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मानाच्या दोन नंदीध्वजांना सिद्धेश्वर मंदिरात एका ठिकाणी ठेवुन तेथेच विधवत पुजन करण्यात आले. नंदीध्वज हे योगदंडाचे प्रतीक मानला जातो.
यावेळी दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, मानकरी इरय्या पुराणिक, चन्नविर पुराणिक, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, गिरमल्लप्पा सावळगी, मलकाजप्पा अल्लापुर, श्रीमंतप्पा परमशेट्टी, बसण्णा धल्लू, सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, सिद्धाराम मल्लाड, हणमंतराव पाटील, लक्ष्मीपुत्र पाटील, मलकण्णा गुड्डोडगी, मल्लिनाथ पाटील, मल्लिनाथ येगदी, गुरुशांत ढंगे, अप्पु मंथा, रेवणसिद्ध पाटील, सुगुरेश बाहेरमठ, शिवानंद फुलारी, मल्लय्या पुराणिक, गुरूपादय्या सालीमठ, सीद्दण्णा गुळगोंडा, शिवानंद बिंजगेरी, काशिनाथ गाडी, शांतलिंग वागदरी, रमेश निंबाळ, दौलत हौदे, अंबण्णा निंबाळ, चंद्रकांत धल्लू, नंदकिशोर संगोळगी, संतोष पोतदार, सुरेश तोळणुर, सैदप्पा जानकर, महेश गुळ्गोंडा, बसवराज कौलगी, सातलिंग अंदेनी, गुरुशांत निंबर्गी,श्रीशैल घुळणुर, उपस्थित होते.