ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशव्यापी बंदला दुधनी व्यापारी असोसिएशनने दर्शविला पाठिंबा, आठवडी बाजार रद्द

गुरुराज माशाळ

दुधनी : केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याला देशातील कृषी संघटनांनी उद्या दिनांक आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी दुधनी आडत व भुसार व्यापारी असोसिएशनने पाठिंबा जाहीर केले आहे. या संदर्भात दुधनी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच दुधनीत दर मंगळवारी भरविण्यात येणारी आठवाडी बाजार देखील रद्द करण्यात आले आहे.

दिल्लीतील मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्या विरोधात तीव्र आंदोलनासाठी देशातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या भारत बंदला दुधनी आडत व भुसार व्यापारी असोसिएशन देखील पूर्णपणे समर्थन देत आहे, असे दुधनी आडत व भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी यांनी सांगितले.

दिल्लीतील बंदला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक बाजार समित्यांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी, शिवानंद माड्याळ, गिरमल्ल सावळगी, शिवानंद हौदे, अशोक पादी, रेवणसिद्ध पाटील, जगदीश माशाळ यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!