नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. वसंत गिते व सुनील बागुल हे दोन मोठे नेते आज भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे.
गिते व बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. संजय राऊत हे आज पत्रकार परिषद घेऊन गिते व बागुल यांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करणार आहेत. त्यांनतर सायंकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन हाती बांधणार आहेत.
नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने राजकीय दावपेच टाकत आहेत. शिवसेनेनेही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आता नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.