ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नियमांचे पालन करु, सोलापुरातील सिध्देश्‍वर यात्रेला परवानगी द्या, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेला 950 वर्षांची परवानगी आहे. कोरोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर यात्रेला परवानगी द्यावी. यात्रेला परवानगी मिळावी, यासाठी आमदार संजय शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख यांनी राज्य सरकारकडे प्रयत्न करावा, अशी अपेक्षा भक्‍तांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या सिद्धरामेश्‍वर यात्रेला परवानगी मिळावी, यासाठी हिरेहब्बू वाड्यात आज सायंकाळी आमदार देशमुख व आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीला शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, रेवणसिद्ध अवजे, सोमनाथ मेंगाणे, सुरेश म्हमाणे, बाबासाहेब देशमुख, योगीनाथ कुर्ले, बिपीन धुम्मा, कुमार शिरसी, नागनाथ मेंगाणे, भैरू पाटील, विकास हिरेहब्बू, प्रसाद कुमठेकर यांच्यासह सिद्धरामेश्‍वर भक्तांची उपस्थिती होती. राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, या यात्रेला साडेनऊशे वर्षांचा इतिहास. त्यामुळे सरकारने यात्रेला परवानगी द्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी जे नियम आवश्‍यक आहेत. त्या नियमांचे पालन केले जाईल. आमदार संजय शिंदे यांनी या प्रश्‍नी लक्ष घातल्याने यात्रेला परवानगी मिळेल, असा विश्‍वास आहे.

बैठकीत रेवणसिद्ध अवजे म्हणाले, यात्रेतील भाविकांची संख्या कमी करावी. परंतु यात्रेला परवानगी द्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झालेला आहे. यात्रेत येणाऱ्या सात नंदीध्वज या 18 पगड जातीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे या उत्सवाला सरकारने परवानगी द्यावी. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार संजय शिंदे यांनी एकत्रितपणे प्रयत्न करुन यात्रेला परवानगी मिळवावी.

– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार चर्चा

यात्रेला साडेनऊशे वर्षांची परंपरा आहे. यात्रेला परवानगी मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले आहे. ब्रिटिशांनी संचारबंदी लावल्यानंतरही सोलापूरची यात्रा पार पडली. या वर्षीदेखील यात्रा पार पाडावी. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या नियमांचे पालन केले जाईल.
– विजयकुमार देशमुख, आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!