सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी नवीन सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी नव्या आरक्षणानुसार या गावांतील सरपंचांची निवड होणार आहे. पंढरपूर तालुक्यातील ७२ तर सांगोला तालुक्यातील ६१ गावातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची २६ रोजी निवड होणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील 2 ग्रामपंचायतचाही यात समावेश आहे.
सरपंच आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या 22 याचिकांची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर झाली. मोहोळ, माढा, माळशिरस व दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील सरपंच निवडीचे जुने आरक्षण कायम करण्यात आले आहे. या तालुक्यांतील सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी 23 फेब्रुवारीला होणार आहेत. पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात तहसीलदारांनी केलेल्या आरक्षणावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नव्याने आरक्षण काढण्याचे आदेश दिले आहेत.