मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१० : परतीच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण ९२ टक्के भरले आहे.
पाण्याचा ‘फ्लो’ असाच कायम राहिल्यास रविवारपर्यंत हे धरण भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी वर्तवला आहे. सध्या नळदुर्ग येथे नर – मादी धबधबा सुरु आहे. तेथूनच पाण्याचा प्रवाह बोरी नदीकडे सुरू आहे.त्या
भागात सातत्याने पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वरचेवर वाढ होत आहे.हरणा आणि बोरी नदीच्या संगमावरती हे धरण असल्याने दोन्ही नद्या वाटे या धरणांमध्ये पाणी येऊन मिसळते.सध्या धरणाचा विसर्ग थोडा कमी असला तरी हरणा नदीवरती देखील हे धरण अवलंबून आहे. पण दरवर्षी बोरी नदीच्या पाण्यात हे धरण शंभर टक्के भरत असते.या वर्षीदेखील बोरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्यानंतरच धरणाची वाटचाल शंभर टक्क्याकडे सुरू झाली आहे.धरणाची वाटचाल शंभर टक्क्यांकडे सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.बोरी नदीच्या खालच्या भागात आठ कोल्हापुरी बंधारे आहेत.त्या बंधाऱ्यातही पावसामुळे चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सध्या तरी शहर आणि तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.मात्र धरण भरत असल्याने येत्या वर्षभराचा तालुक्याचा पाणी प्रश्न मिटत असल्याने प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला आहे.