ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाटोदा ग्रा.पं.मध्ये आदर्श सरपंच पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

औरंगाबाद :  गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे. गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव झाला आहे.

नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असले तरी त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील ही निवडणुकीत उभी होती. परंतु तीन जागांसाठी मतदान झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला तेव्हा अनुराधा पाटील या पराभूत झाल्याचा समोर आले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या उमेदवाराला २०८ मते मिळाली तर अनुराधा पेरे पाटील यांना १८३ मते मिळाली आहेत.

अनुराधा पेरे यांचा पराभव धक्कादायक समजला जात असून पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक होण्यामागे भास्कर पेरे पाटील यांच्या गटा बद्दल असलेली नाराजी होती हे आता स्पष्ट झाले आहे.  अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये आठ सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. तीन जागांसाठी मतदान झाले, पैकी एका जागेवर भास्कर पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पाटील या उमेदवार होत्या. मात्र त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!