नागपूर : भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पुणे येथील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात दिली.
देशात पहिल्यांदाच जेल पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात अंमलात आणण्यात येणार असुन येरवडा जेलमधून २६ जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे ,अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. येत्या २६ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते येरवडा येथे कारागृह पर्यटनाचे उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात पुणे येथील येरवडा तुरूंगात पर्यटन सुरू करणार असून दुसर्याा टप्प्यात नाशिक, मुंबई या कारागृहात सुरू करण्याचा विचार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कारागृहात पर्यटन करण्याकरीता ५ रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तर अभ्यासकांना ५० रूपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.