ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा : गेल्या अडीच महिन्यांपासून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज साताऱ्यात विविध संघटनाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  दरम्यान, या आंदोलकांवर कारवाई करत पोलिसांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांना ताब्यात घेतलं.

 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाजवळ कोरेगाव-सातारा मार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. तर काही आंदोलकांनी या महामार्गावरच चूल मांडून भाकऱ्या थापल्या. त्यानंतर काही वेळासाठी याठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. आंदोलनानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!