मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५५ डाॅलरवर गेला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसाठी तेल आयातीचा खर्च वाढला आहे. तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतीही वाढ केली नाही.
पेट्रोलियम कंपन्यांनी २९ दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी असे सलग दोन दिवस इंधन दरवाढ केली होती. त्याआधी कंपन्यांनी २९ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते.या दोन दिवसात पेट्रोल ४९ पैशांनी महागले होते. तर डिझेल ५१ पैशांनी महागले. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलने दोन वर्षांचा उच्चांकी स्तर गाठला आहे.
आज इंधन दर स्थिर असले तरी मुंबईत मात्र मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल ९० रुपयांवर आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९०.८३ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.०७ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.२० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.३८ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.९६ रुपये असून डिझेल ७९.७२ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.६८ रुपये असून डिझेल ७७.९७ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.०४ रुपये असून डिझेलचा भाव ७८.८७ रुपये आहे.