मुंबई : चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या महा विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिक्षण संघर्ष समितीचे वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.