सोलापूर, दि.17: बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे सापडलेल्या धान्य साठ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दुकानांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश श्री. शंभरकर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी ही कारवाई केली.
तालुक्यातील दोनशे रास्तभाव धान्य दुकानांची दहा मंडल अधिकारी आणि 78 पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या सहा दुकांनावर कारवाई करण्यात आली. तपासणीत प्रत्यक्ष गावात जावून 4 हजार 200 लोकांचे जबाब घेण्यात आले. त्या जबाबात लोकांनी अंत्येादय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेचे अन्न मिळाल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. (दुकानदाराचे नाव, गावाचे नाव, दुकान क्रमांक, चौकशीत आढळलेली अनियमितता आणि केलेली कारवाई या क्रमाने)
संतोष अरुण गोडसे, उपळाई ठोंगे, 160, परवान्यात नमुद ठिकाणी व्यतीरिक्त अन्य ठिकाणी धान्याची साठवणूक करणे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.
महिला दुध उत्पादक संस्था, उंबरगे,34, साठा रजिस्टर अद्ययावत ठेवले नाही व वजनकाटा पडताळणी करुन घेतली नाही. दुकानाची अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड.
नारायण महादेव गोरे, चिखर्डे, 61, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त करुन परवाना निलंबित.
संतोष विलास गोडसे, अरणगांव, 160, शासकीय धान्य साठ्याबाबत, भारतीय दंड विधान कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल असल्याने दुकानाचा परवाना रद्द.
शोभाताई सोपल महिला बचतगट, पानगांव, 84, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड.
मोहन अर्जुन संकपाळ, झरेगांव, 68, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड.