सोलापूर : करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाच हत्यारे पोलीस, शस्त्रधारी वनरक्षक आणि शार्पशूटर पाचारण करण्यात आले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आज दिली.
करमाळा तालुक्यातील काही गावात गेले काही दिवस नरभक्षक बिबट्याचा वावर आहे. त्याच्या हल्यात मनुष्यहानी झाली असल्याने त्यास ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी वनविभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. वनविभागाने करमाळा वनपरिक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी 40 कॅमेरा ट्रॅप, पंधरा पिंजरे, बेशुद्ध करणारी तीन पथके, श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे. बिबट्याचे नेमके ठिकाण कळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जात आहे, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
बिबट्याला पिंजरा बंद करण्यास किंवा बेशुद्ध करुन बंदिस्त करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती आणि इतर कारणांमुळे बिबट्यास बेशुद्ध करण्यास शक्य न झाल्यास अधिक मनुष्यहानी टाळण्यासाठी त्यास ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, बिबट्याच्या हालचालीची माहिती तत्काळ हॅलो फॉरेस्ट लाईनच्या 1926 क्रमांकावर द्यावी, असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे. तसेच व्ही.डी. बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहोळ (७०३८६९५२६४) , डी. डी. साळुंखे, वनपाल, करमाळा (९४२१०५११३८/7756823041) , एस.आर. कुरले, वनरक्षक, करमाळा (८२०८५००१८८), एस.बी. पाटील, लिपिक, विभागीय कार्यालय, सोलापूर (८२०८७४५४९२) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
बिबट्या अधिवास परिसरात घ्यावयाची काळजी
बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका. पाठलाग करू नका.
अंधाराच्या वेळी मुलांना एकटे सोडू नका.
अंधारात एकटे फिरताना, शेतात पाणी देताना मोठ्याने गाणी म्हणा किंवा मोबाईलवर लावा.
शेतात जाताना कंदील, बॅटरी, काठी सोबत ठेवा. पाळीव कुत्र्याच्या गळ्यात काटेरी पट्टा बांधा, सोबत शिट्टी ठेऊन ठराविक अंतराने वाजवा.
बिबट्याने केलेल्या शिकारीच्या जवळ जाऊ नका, तो आजूबाजूला असू शकतो.
कुत्रे, बकऱ्या, डुकरे बिबट्याला वस्तीकडे आकर्षित करतात, यामुळे गुरांना बंदिस्त गोठ्यात ठेवा.
रात्री गोठ्यात प्रखर उजेडाची लाईट लावा, इतर वन्यप्राणी रानडुकर, हरीण, जंगली ससे बिबट्याचे खाद्य असल्याने या प्राण्यांचे शिकाऱ्यापासून संरक्षण करा.
गावाजवळचा बिबट्याचा वावर कमी कसा कराल
गाव स्वच्छ ठेवल्यास मोकाट कुत्रे, डुकरे कमी होतील.
सापळे लावू नका, सापळ्यात अडकलेले बिबट्या शिकार करू शकत नाही. यामुळे तो धोकादायक बनू शकतो.
गावात बिबट्या दिसल्यास दवंडी देऊन लोकांना ‘त्या’ ठिकाणी जाण्यास बंदी करावी.