ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपला राज्यात तर काँग्रेसला अक्कलकोट तालुक्यात सत्ता नसल्याचे दुःख !

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुका नेहमी राजकीय दृष्ट्या राज्याच्या राजकारणाच्या तुलनेत अपयशी ठरला आहे. कारण ज्या ज्या वेळी राज्यात एखाद्या पक्षाची सत्ता येते त्याच्या विरोधातील सत्ता ही नेहमी तालुक्यात येत असते त्यामुळे नेहमी भाजप आणि काँग्रेसला ‘कही खुशी कही गम’ अशा राजकीय वातावरणाला सामोरे जावे लागते.अगदी तशाच
पद्धतीचा प्रत्यय पुन्हा एकदा अक्कलकोट तालुक्यातील जनतेला व कार्यकर्त्यांना
येत आहे.

राज्यात अनपेक्षितरित्या काँग्रेस,
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार आले
तर सर्वाधिक जागा भाजपच्या येऊनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले
पण अक्कलकोट तालुक्यात मात्र भाजपची
सत्ता आली आहे.राज्यातील या अनपेक्षित सत्तेच्या समीकरणामुळे येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांना मात्र नक्की बळ मिळाले.परंतु आमदार त्यांच्या पक्षाचा नसल्याने त्यांची ही मोठी ‘गोची’ झाली आहे.सध्या माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे
हे आपापल्या मार्गाने पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.
वर्षभरात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यादृष्टीने व्यूहरचना आखून त्याची तयारी सुरू केली आहे.शिवसेनेकडून मध्यंतरी अतिवृष्टी वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांचा दौरा झाला. निवडणूकीच्या दृष्टीने
देखील वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा,छोटे कार्यक्रम घेऊन तालुक्यात शिवसेनेची बांधणी वेगाने सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनीही आमदार रोहित पवार,अरुण लाड यांच्या उपस्थितीत मेळावे घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.स्वामी समर्थ कारखाना सुरू करण्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला आहे.तर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सरकार विरोधातले असले तरी विकास कामे होण्यासाठी वरच्या पातळीवर विविध नेत्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. मागच्या सव्वा वर्षाच्या कालावधीत शंभर कोटीच्या रस्त्यांना मंजुरी आणली अशी माहिती त्यांनी दिली आहे.दर आठवड्याला सोमवारी जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची ते सोडवणूक करत आहेत.सरकार त्यांच्या विरोधातील असल्यामुळे मोठी कामे होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण त्यांच्या पातळीवरची कामे ते करत आहेत,ही वस्तुस्थिती आहे.आठ दिवसापूर्वी झालेल्या भाजपच्या नूतन कार्यकारिणी भाजपमधील काही कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारिणीतील पदे देऊन ग्रामीण भागात भाजप आणखी बळकट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत.कारण पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आलेले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना देखील आमदारकीनंतर ते प्रथमच सामोरे जात आहेत.त्यांच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या राहतील. दुसरीकडे काँग्रेसमध्ये वरती सत्ता असली तरी तालुक्यात सत्ता नसल्याचे दुःख कार्यकर्त्यांच्या मनात आहे. तरीही माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे सिंचन व इतर कामासाठी राज्यपातळीवर काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. तालुक्यात दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे हे ऍक्टिव्ह झालेले आहेत. काँग्रेसला तालुक्यात पुन्हा उभारी देण्यासाठी म्हेत्रे यांच्यासाठी पुढील निवडणुका या फार महत्त्वाच्या आहेत.

…अजूनही जर तरच्या चर्चा !

काँग्रेसचे कार्यकर्ते तालुक्‍यात सत्ता
नसल्याने सैरभैर आहेत तर भाजपचे कार्यकर्ते हे तालुक्यात सत्ता आहे पण राज्यात सत्ता नाही, याची चर्चा अजूनही करत आहेत.कार्यकर्ते भविष्याच्या वेध घेत आपापल्या नेत्यांबरोबर जर तरची गणिते अजूनही मांडत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!