सिडनी : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाच्या पडझडीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुस-या डावाला सुरुवात केली आहे. सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आणि विल पोकोवस्की मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, भारताकडून शुभमन गिल (५०) आणि चेतेश्वर पुजारा (५०) यांनी अर्धशतके झळकावली. त्याच्याशिवाय रिषभ पंतने ३६ धावा केल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजा २८ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने २९ धावांच्या मोबदल्यात ४ फलंदाज बाद केले. तर जोश हेजलवुडला २ आणि मिशेल स्टार्कला एक विकेट मिळाली. तर, भारताचे तीन फलंदाज धावचीत झाले. यात हनुमा विहारी (४), आर. अश्विन (१०), जसप्रित बुमराह (०) यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी, दिवसाच्या पहिल्या सत्रातच कर्णधार अजिंक्य रहाणे (२२) बाद झाला. हा भारताला मोठा धक्का होता. त्यानंतर लगेचच हनुमा विहारी धावचीत झाला. हेजलवूडने फेकलेल्या अचूक थ्रो त्याला माघारी परतावं लागलं. विहारी बाद झाल्यानंतर रिषभ पंत मैदानावर उतरला. पुजाराने पंतला सोबतीला घेऊन संयमी-आक्रमक फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेर भारतीय संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या.